SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सफाई कर्मचाऱ्यांच्या 35 कुटुंबांना राहती घरे देण्यास मंजुरी - राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांच्या हस्ते हस्तांतर पत्र वाटप बायोगॅस योजनेचे प्रलंबित लाभार्थी अनुदान मंजूर जिल्ह्यात लाळ खुरकत प्रतिबंधात्मक लसीकरणाची नववी फेरी सुरुकोल्हापूर जिल्ह्यात 26 ऑगस्टपर्यंत बंदी आदेश लागूगोकुळ दूध संघाचे निवडणूक अधिकारी व उपनिबंधक देविदास मिसाळ यांचेविरुद्ध अवमान याचिका दाखल होणारसफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने कार्यवाही करावी : शेरसिंग डागोरस्वातंत्र्यदिनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणहॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि मिठाई दुकानांची तपासणी करा : आपची मागणी केआयटीमध्ये ‘कल्पनेपासून उद्योगापर्यंत’ या कार्यशाळेचे आयोजनअंगदान दिन: जीवनदानाची अपूर्व संधी

जाहिरात

 

सफाई कर्मचाऱ्यांच्या 35 कुटुंबांना राहती घरे देण्यास मंजुरी - राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांच्या हस्ते हस्तांतर पत्र वाटप

schedule13 Aug 26 person by visibility 199 categoryमहानगरपालिका

  कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी आज कोल्हापूर महानगरपालिकेत सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांचा आढावा घेतला. महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात झालेल्या बैठकीस महापौर सौ. रुपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड उपस्थित होते. यावेळी महापौर सौ. रुपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी अध्यक्ष शेरसिंग डागोर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

  या बैठकीत टिंबर मार्केट तसेच शहरातील विविध ठिकाणी महापालिकेच्या चाळींमध्ये वास्तव्यास असलेल्या 35 सफाई कर्मचाऱ्यांना राहती घरे देण्यास मंजुरी देण्यात आली. गेल्या 14 वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या पुढाकाराने मार्गी लागला आहे. यापैकी चार सफाई कर्मचाऱ्यांना घरांच्या औपचारिक हस्तांतरणाची पत्रे आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांच्या हस्ते देण्यात आली. तसेच वारसा हक्काच्या नियुक्तीअंतर्गत दोन सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांना संरक्षण साहित्याचेही वाटप करण्यात आले.

  बैठकीच्या प्रारंभी आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी महापालिकेच्यावतीने सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. संभाजीनगर येथील कामगार चाळीच्या प्रस्तावित नवीन इमारतीचा डीपीआर सादरीकरणाद्वारे दाखविण्यात आला. या प्रकल्पामध्ये दोन इमारती उभारण्यात येणार असून एकूण 104 सदनिका असतील. प्रत्येक कर्मचाऱ्यास सुमारे 360 चौरस फूट कारपेट क्षेत्रफळाचा फ्लॅट उपलब्ध करून देण्यात येणार असून अत्याधुनिक सुविधांचा समावेश करण्यात येणार आहे. महापालिकेच्यावतीने सफाई व झाडू कामगारांसाठी नूतनीकरण करण्यात आलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात पहिला सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली. ‘नमस्ते’ कार्यक्रमांतर्गत कर्मचाऱ्यांना वेळोवेळी संरक्षण साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी केली जात आहे. प्रलंबीत जुन्या नियुक्तींबाबत कायदेशीर बाबींची पूर्तता करून हेरिंग घेण्यात येणार आहे. त्यानंतर रिक्त असलेल्या 50 जागा भरण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  यावेळी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांच्या प्रश्नाबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या. शासन निर्णयानुसार 300 चौरस फूट जागा मोफत देऊन, त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या बांधकामाचा खर्च संबंधित कर्मचाऱ्यांकडून घेण्याबाबत त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा असे त्यांनी सांगितले. सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. महापालिकेने मागील बैठकीत दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करून अनेक कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. शासनाने सफाई कर्मचाऱ्यांसाठी वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे असे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी सांगितले. सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी समाज कल्याण विभागामार्फत शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 3,500 रुपये मिळतात. तसेच घरकुल योजना उपलब्ध आहे. या योजनांचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी समाज कल्याण विभागाशी समन्वय साधून विशेष शिबिर घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. कर्मचाऱ्यांचे वेतन ज्या बँकेत जमा होते, त्या बँकेच्या सहकार्याने कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांचे अपघाती विमा संरक्षण, पाच लाख रुपयांचे नैसर्गिक मृत्यू विमा संरक्षण आणि कुटुंबासाठी पाच लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. शासन निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी लवकरच मुंबई येथे सर्व महापालिका आयुक्त व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

  महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर हे सफाई कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे अध्यक्ष असल्याचे सांगितले. शहर स्वच्छ ठेवण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे. मी महिन्यातून एकदा या कर्मचाऱ्यांसोबत स्वच्छता मोहिमेत सहभागी होते. महापालिकेच्यावतीने सफाई कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्या प्रभागातील सफाई कर्मचाऱ्यांच्या भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माझा निधी प्राधान्याने खर्च करीत आहे असे सांगितले.

  यावेळी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी अल्पावधीत सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांची प्रभावीपणे दखल घेत ते मार्गी लावल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच, महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी आयुक्त डॉ. भारुड यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes