चित्रदुर्ग मठामध्ये एक कुटुंब स्थलांतरीत
schedule20 Aug 25 person by visibility 121 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी सतत वाढत असून ती धोका पातळीच्या दिशेने वाटचाल करत आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन महापालिकेची सर्व यंत्रणा अलर्ट ठेवण्यात आली आहे. चारही विभागीय कार्यालयातील सर्व निवारा केंद्रे सज्ज ठेवण्यात आली असून पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
आज सायंकाळी 4 वाजता सुतारवाडा परिसरात नदीचे पाणी नागरी वस्तीजवळ पोहोचल्याने सुरक्षेच्या दृष्टीने एका कुटुंबाला चित्रदुर्ग मठ येथील महापालिकेच्या निवाराकेंद्रामध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी हलवून आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच या परिसरात सतत अलर्ट ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दुपारी पंचगंगा नदीची पाणीपातळी 40 फुट 11 इंचांवर पोहोचल्याने प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी स्वतः सुतारमळा परिसराला भेट देऊन तेथील नागरिकांना स्थलांतरीत करण्याचे आदेश दिले. यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी मनिष रणभिसे व अन्य कर्मचारी उपस्थित होते. पुराचा धोका संभवणाऱ्या इतर भागांमध्येही संबंधित अधिकाऱ्यांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.