कोल्हापूर : शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. खड्डेमय प्रवासाने नागरिक हैराण झाले आहेत. निकृष्ट दर्जाचे काम केल्यानेच शहरातील रस्ते मुदतीआधी खराब झाल्याचा आरोप करत आम आदमी पार्टीने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महापालिका इमारतीला घेराव घातला.
खड्डेप्रश्नी महापालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी शहरातील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. हातात हात घेऊन मानवी साखळी करत नागरिकांनी शहरातील खड्ड्यांच्या निषेध केला. देशभक्तीपर गाणी, खड्ड्यांवरील कवितांनी महापालिका समोरील वातावरण ऊर्जामय होऊन गेले होते.
या आंदोलनात विविध संघटनांनी सहभागी होत पाठिंबा दिला. यामध्ये शहरातील विविध रिक्षा संघटना, कोल्हापूर सायकल क्लब, शिवाजी पार्क दुर्दशा ग्रुप, वृक्षप्रेमी संस्था, जय हनुमान ज्येष्ठ नागरिक संघटना, आर्कीटेक्ट अँड इंजिनिअर्स असोसिएशन, मराठा महासंघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, शालेय पोषण आहार संघटना, टिप्परचालक संघटना आदींनी सहभाग नोंदवला.
दर्जेदार रस्ते होण्यासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम जाहीर करण्याची मागणी आप ने प्रशासनाकडे केली होती. तसेच दोष दायित्व मुदतीत असलेल्या रस्त्यांचे काम त्वरित सुरु करावे, कर्मचारी व अभियंतांची भरती करावी, डांबर प्लांट सुरु करावे, खराब झालेल्या काँक्रीट रस्त्यांची चौकशी करावी, शहरातील मुख्य रस्त्यांसाठी आणखी दोनशे कोटींचा निधी द्यावा, शंभर कोटी रस्त्याच्या कामाचा दर्जा टिकवण्यासाठी समन्वय ठेवावा आदी मागण्या केल्या होत्या.
यावर प्रशासकांकडून ठोस लेखी उत्तर न मिळाल्यास या घेराव आंदोलनाचे रूपांतर ठिय्या आंदोलनात करून स्वातंत्र्य दिनी महापालिकेसमोर बसण्याचा इशारा आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी दिला होता.
महापालिका प्रशासनासोबत सायंकाळी उशिरापर्यंत बैठक सुरु होती. यामध्ये दोष दायित्व मुदतीत असलेले रस्त्यांची कार्यवाही येत्या पंधरा दिवसात करू, क्वालिटी कंट्रोलसाठी विभागीय अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करू, डांबरी पॅचवर्कचे काम पंधरा दिवसात पूर्ण करू, नगरोथान मधून आणखीन निधी मागणीचा प्रस्ताव केला आहे, तो पुढील मंजुरीसाठी पाठवू, रस्त्याची गुणवत्ता राखण्यासाठी दक्षता समिती स्थापन करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही ठेवण्यात येईल. अभियंता भरतीसाठी कौशल्य विकास कार्यक्रमा अंतर्गत कर्मचारी भरणार असल्याचे महापालिकेकडून लेखी देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे, वसंतराव मुळीक, उत्तम पाटील, सूरज सुर्वे, किरण साळोखे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, दुष्यंत माने, विजय हेगडे, प्रसाद सुतार, डॉ. कुमाजी पाटील, बबन कावडे, संजय नलवडे, मयुर भोसले, इस्थेर कांबळे, आदम शेख, उषा वडर, बबन भालेराव, नाझील शेख, लखन काझी, उमेश वडर, रवींद्र राऊत, रणजित पाटील, मनोहर नाटकर, रमेश कोळी, अमरसिंह दळवी, दिग्विजय चिले, प्रथमेश सूर्यवंशी, स्वप्नील काळे, ओंकार पताडे, संजय सूर्यवंशी, संजय चव्हाण आदी उपस्थित होते.