आरोग्यदूत प्रशांत साळुंखे यांच्या तत्परतेमुळे अपघातग्रस्त पती-पत्नीचा वाचला जीव!
schedule20 Jun 26 person by visibility 111 categoryआरोग्य
शाहूवाडी : शाहूवाडी येथील धोकादायक वळणावर झालेल्या भीषण दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या पती-पत्नीला वेळेत वैद्यकीय मदत मिळवून देत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख आरोग्यदूत प्रशांत साळुंखे यांनी त्यांचे प्राण वाचवले. साळुंखे यांनी दाखवलेल्या या सामाजिक बांधिलकीचे आणि तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राजाराम परीट आणि सुवर्णा परीट (रा. आंबर्डे, तालुका शाहूवाडी) हे पती-पत्नी दुचाकीवरून प्रवास करत होते. शाहूवाडी येथील एका वळणावर त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले आणि रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. अपघात एवढा भीषण होता की वेळेत उपचार न मिळाल्यास त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकला असता.
त्याच वेळी त्या मार्गावरून प्रवास करत असलेले आरोग्यदूत प्रशांत साळुंखे यांचे या घटनेकडे लक्ष गेले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपली गाडी थांबवली. रुग्णवाहिकेची वाट न पाहता साळुंखे यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी राजाराम आणि सुवर्णा परीट यांना स्वतःच्या गाडीत बसवले.
मलकापूर सरकारी दवाखान्यात तातडीने दाखल केले. दरम्यान साळुंखे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे यांना संपर्क साधून पुढील आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी सांगितले. त्याचबरोबर मलकापूरचे वैद्यकीयचे सदस्य अमित गिरी, सर्जेराव पाटील पेरीडकर, गणेश गोखले त्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
प्रशांत साळुंखे यांनी अत्यंत वेगाने गाडी चालवत जखमींना तातडीने मलकापूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले. तिथे त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना वेळेत रुग्णालयात आणल्यामुळे त्यांच्यावर योग्य उपचार करणे शक्य झाले आणि त्यांचे प्राण वाचले.