कोल्हापूर जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध
schedule03 May 25 person by visibility 286 categoryराज्य

▪️शेतकऱ्यांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर द्यावा : कृषि विभाग
कोल्हापूर : जिल्हा परिषद अंतर्गत कृषि विभागामार्फत प्राप्त माहितीनुसार, सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विविध रासायनिक खतांचा एकूण 61,953 मेट्रिक टन इतका आवश्यक साठा उपलब्ध आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
युरिया: 18,285 मेट्रिक टन
डीएपी: 2,915 मेट्रिक टन
एमओपी: 5,789 मेट्रिक टन
संयुक्त खते: 28,312 मेट्रिक टन
एसएसपी: 6,489 मेट्रिक टन
कृषि विभागामार्फत शेतकरी बांधवांना एकच प्रकारच्या खताची मागणी न करता एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (Integrated Nutrient Management) करण्याची शिफारस करण्यात येत आहे. शेतजमिनीची कस व उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी जमिनीच्या आरोग्य पत्रिकेनुसार योग्य व संतुलित खतांचा वापर करावा. यामध्ये सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक खतांचा संतुलित समावेश असावा.
खते खरेदीसाठी ई-पॉस मशीन बंधनकारक – शेतकऱ्यांनी आधार कार्डासह खरेदी करावी
खत वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक व शिस्तबद्ध करण्यासाठी खत कंपन्यांमार्फत नवीन ई-पॉस मशीनचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे आता खतांचा पुरवठा सुरळीतपणे होणार आहे. शेतकऱ्यांनी खते खरेदी करताना ई-पॉस मशीनवरूनच खरेदी करावी, आधार कार्ड सोबत आणावे आणि अधिकृत पावती (बिल) घ्यावी. यामुळे बनावट खत विक्रीवर नियंत्रण आणणे शक्य होणार आहे असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी सारिका रेपे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
▪️खत विक्रेत्यांना महत्त्वाची सूचना
सर्व खत विक्रेत्यांना सूचित करण्यात येते की, ई-पॉस प्रणालीवरील साठा आणि दुकानातील प्रत्यक्ष साठा यामध्ये विसंगती आढळल्यास ‘खत नियंत्रण आदेश, 1985’ अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे सर्व दुकानदारांनी नियमित साठा नोंदी अद्ययावत ठेवाव्यात व ई-पॉस प्रणालीचा योग्य वापर करावा अश्या सूचना जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी जालिंदर पांगारे यांनी दिल्या आहेत.
▪️शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या खताची तक्रार असेल तर आपल्या जवळच्या पंचायत समिती कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयास संपर्क करा असे आवाहन करण्यात येत आहे.