निवडणुकीनंतर लाडकी बहीण राज्य सरकारला सावत्र झाली; आमदार सतेज पाटील यांची टिका...
schedule03 May 25 person by visibility 320 categoryराजकीय

कोल्हापूर : निवडणुकीनंतर लाडकी बहीण राज्य सरकारला सावत्र झाली आहे. अशी टिका विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. हॉटेल सयाजी येथील एका कार्यक्रमानंतर आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकारचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडलेल आहे. राज्याचे बजेट आल्यानंतर साठ टक्के निधी खर्च करा असा पहिला जीआर आला. याचवेळी बजेटला कात्री लागली आहे. अद्याप लाडक्या बहिणींचे एप्रिल महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत. तर 2100 रूपये स्वप्न अद्याप स्वप्नच राहिले आहे. आता तर सामाजिक न्याय विभागाचे मंत्रीच म्हणत आहेत. माझा विभाग बंद करा .एवढ मोठ वक्तव्य मंत्रीच करत असतील तर महाराष्ट्राची आर्थिक घडी किती विस्कटली आहे. हे महाराष्ट्राला दिसत असल्याची टीका त्यांनी केली.
विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या रक्कमेत वाढ करुन 2100 रूपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, 1500 रूपये देखिल महिलांना वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळं लाडकी बहीण निवडणुकीनंतर राज्य सरकारला सावत्र झाली आहे. अशी जोरदार टीकाही आमदार सतेज पाटील यांनी केली.
दरम्यान शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीच आश्वासन मी दिलं होतं काय? असा प्रतिसवाल पत्रकारांना करत, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून हात वर केले होते.
यावर बोलतांना आमदार सतेज पाटील यांनी, अजितदादा उपमुख्यमंत्री पदावर काम करत आहेत ते एक सामुदायिक जबाबदारी पार पाडत आहेत. जेव्हा एखाद्या प्रश्नाचे उत्तर द्यायचं असतं तेव्हा हे सामुदायिक आहे. असे तिघे म्हणतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं आमच सरकार आल्यानंतर कर्जमाफी करू. तुम्ही बोलला होता आणि ते करा. मी बोललो नाही म्हणजे माझी जबाबदारी नाही. असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. कर्जमाफीसाठी तुम्ही निवडणुकांची वाट बघत आहात का? असे खडे बोल सुनावत, राजकीय स्वार्थासाठी तुम्ही कर्जमाफीची घोषणा करणार असाल तर विधानसभा बरखास्त करा. निवडणुका लावा आणि कर्जमाफी करा असं आव्हानही त्यांनी केलं.
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसाच्या कार्यक्रमावरही आमदार सतेज पाटील यांनी जोरदार निशाणा साधला. विकास कामांवर निधी खर्च केला म्हणजे शंभर दिवस व्यवस्थित गेले असे नाहीत. नेमकं लोकांसाठी काय केलं हे महत्त्वाच आहे.. शेतकऱ्यांचे लोकांचे प्रश्न आज देखील तोंड आवासून उभे आहेत...स्वतः सर्व्हे करायचा आणि स्वतःची पाठ थोपटून घेणे याला काही अर्थ नसल्याचं त्यांनी सांगितलं. एकूणच राज्याचा राज्यकारभार वेगळ्या प्रकारे सुरू आहे येथे कोणाचे कोणाला पायपोस राहिलेलं नाही. अशी टिकाही आमदार सतेज पाटील यांनी केली. तर जातनिहाय जनगणनेवर बोलतांना त्यानी, जातनिहाय जनगणेच क्रेडिट राहुल गांधी यांना जात आहे. म्हणून सत्ताधाऱ्याकडून टीका केली जात आहे. जातनिहाय जनगणनेमुळे देशाचे आणि महाराष्ट्राचे चित्र बदलेले. यामुळ मराठा आरक्षणाला देखील चालना मिळू शकेल. असंही त्यांनी सांगितलं.
तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वर बोलतांना त्यानी, सुप्रीम कोर्टातील तारीख पुढे गेली आहे. दिवाळीपर्यंत या निवडणुका होतील अशी अपेक्षा आम्हाला आहे. प्रशासकाच्या कारकीर्द कोल्हापूर महानगरपालिकेला पूर्ण होत आहे. आमच्या सोबत नवी मुंबई, नांदेड देखील आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी नसन हे राज्याच्या विकासासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टात लवकर निर्णय होऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हाव्यात अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान माजी आमदार संजय घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी, संजय घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी, शक्तिपीठ बाबत संजय घाटगे यांची भूमिका अद्याप ठाम आहे. मात्र पुढच्या राजकीय विकासासाठी त्यांनी कदाचित भाजपचा मार्ग धरला असेल. असही त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शक्तीपीठ महामार्ग बद्दल शेतकऱ्यांची बाजू समजून घेतली पाहिजे. शक्तिपीठ महामार्गासंदर्भात राज्यातली ऑनलाईन बैठक आम्ही घेत आहोत. प्रत्येक ठिकाणाहून त्याला विरोध होत आहे. मात्र राज्य सरकार महामार्ग करण्यावर ठाम का आहे. असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तर पंचगंगा नदीच्या प्रदूषणासाठी वेगळा निधी मिळायला हवा. नदीच खोलीकरण केल्याशिवाय पुराच्या आणि प्रदूषणाच्या दृष्टीने मुक्त होणार नाहीत. धनगर आरक्षणावर बोलताना त्यांनी, धनगर समाजाने समजून घ्यायला हव की केंद्र आणि राज्य सरकारकडून आपली फसवणूक केली आहे. अशी टिकाही त्यांनी केली.
काही दिवसापुर्वी झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, जिल्हा काँग्रेस अध्यक्षांना ताकद देणे. तसचं येणाऱ्या काळात जिल्हा स्तरावर काँग्रेस अधिक बळकट करने आणि संघटनात्मक बळ देण्याचां निर्णय अधिवेशनात घेण्यात आल्याचे आम. सतेज पाटील यांनी सांगितले.