डिजिटल माध्यमांसाठी नाविन्यता आणि सातत्य आवश्यक : डॉली सिंग
schedule03 May 25 person by visibility 243 categoryराज्य

मुंबई : स्पर्धात्मक डिजिटल युगात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी चांगली संहिता, विषयांची प्रभावी मांडणी, व्हिज्युअलचा योग्य वापर याबरोबरच नाविन्यता आणि सातत्य असणे आवश्यक असते, असे मत सोशल मीडिया इन्फ्लुएंसर व कंटेंट क्रिएटर डॉली सिंग यांनी व्यक्त केले.
बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटर येथे जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेत "Connecting Creators, Connecting Countries" या चर्चासत्रात त्या बोलत होत्या. यावेळी देश-विदेशातील नामवंत सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि लोकप्रिय कंटेंट क्रिएटर सहभागी झाले होते.
डिजिटल माध्यमात आपली ओळख निर्माण करण्यासाठी करण्यासाठी प्रेक्षकांशी संवाद साधणे आणि त्यांच्या प्रतिसादाला उत्तर देणे तेवढेच महत्वाचे आहे. यामध्ये नाविन्यता आणि नियमित दर्जेदार मजकूर अपलोड करणे गरजेचे असते,असे श्रीमती सिंग यांनी यावेळी सांगितले.
सोशल मीडियावरील पोस्टसाठी आवश्यक व्हिडिओ, मजकूर,विषय मांडण्याची पद्धत, संपादनाची शैली आणि सादरीकरणाची पद्धत हे सर्व घटक वेगळेपण सिद्ध करतात. तसेच कोणतीही प्रसिद्धी करण्यापूर्वी सोशल मीडियावर शॉर्ट व्हिडिओ, टीझर किंवा ट्रेलर प्रसिद्ध करणे आवश्यक असते तरच त्या इव्हेंटबाबत उत्सुकता निर्माण होते आणि प्रेक्षक जोडले जातात असे सांगून डॉली सिंग यांनी स्वतःच्या अनुभवातून कंटेंट निर्मितीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला.