परदेश दौ-यावर जाणा-या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या शुभेच्छा
schedule19 Jan 26 person by visibility 79 categoryराज्य
▪️कृषी विभागाचा शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना
मुंबई: कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांची ज्ञानवृद्धी व आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने “शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना”मधील रवाना झालेल्या शेतक-यांना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधून शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी परदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करून तो अनुभव राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन केले.
“शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना”अंतर्गत २०२५-२६ या वर्षात तीन अभ्यास दौरे नियोजित आहेत. त्यामध्ये युरोप, इस्राईल आणि मलेशिया,व्हिएतनाम, फिलिपाईन्स या देशांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत १७ जानेवारी २०२६ रोजी मलेशिया, व्हिएतनाम व फिलिपाईन्स या तीन देशांचा एकत्रित अभ्यासदौरा आयोजित केला आहे. या दौऱ्यातील सहभागी शेतकऱ्यांनी पुणे येथून मुंबई मार्गे पुढे प्रस्थान केले असून, या दौऱ्यामध्ये राज्यातील १५ प्रगतशील शेतकरी, १ कृषी विभाग अधिकारी तसेच १ प्रवासी कंपनी प्रतिनिधी हे सहभागी झाले आहेत.
या अभ्यास दौऱ्यामध्ये सहभागी शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती, संरक्षित शेती, कृषी प्रक्रिया उद्योग, निर्यातक्षम उत्पादन तंत्रज्ञान, तसेच विविध देशांतील कृषी व्यवस्थापन व विपणन व्यवस्था यांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. या अनुभवाचा उपयोग करून राज्यातील शेती अधिक उत्पादनक्षम व शाश्वत करण्यास मदत होणार आहे.विशेष बाब म्हणजे, २०१९ नंतर आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच परदेश अभ्यास दौरा असून कृषी विभागाने पुन्हा एकदा ही महत्वाकांक्षी योजना प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळून राज्यातील शेती विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास विभागाने व्यक्त केला आहे.