केंद्र सरकारच्या क्षयरोग निर्देशांकामध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम
schedule19 Jan 26 person by visibility 59 categoryराज्य
कोल्हापूर : जानेवारी ते डिसेंबर- २०२५ मध्ये राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत केंद्र सरकारच्या निर्दशांकामध्ये ऊत्कृष्ट कामगिरी करून कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम आला आहे. हे यश संपादन करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.प्रशांत वाडीकर आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
डॉ. हर्षला वेदक यांच्या नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे हे यश साध्य झाले आहे असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काढले तसेच त्यांनी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमामधील केंद्र सरकारच्या निर्देशांकाच्या वाढी साठी व क्षयरुग्ण सेवेसाठी अहोरात्र काम केलेल्या सर्व जिल्हा/तालुकास्तरावरील अधिकारी,आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका, खाजगी संस्था, पी.पी.एस.ए.यांचे अभिनंदन केले. शासनामार्फत क्षयरोगाचे निदान व उपचार मोफत केला जातो. क्षयरोगाचे निदान करण्यासाठी जिल्हयात 20- ट्रूनॅट, 4-सी.बी.नॅट, 24- एक्स-रे ,98- मायक्रोस्कोपी सेंटर्स उपलब्ध आहेत. निदान झालेल्या क्षयरुग्णास सर्व शासकिय आरोग्य संस्थेतून किंवा रुग्णास त्यांच्या घराजवळील सोयीच्या आरोग्य संस्थेमध्ये उपचार दिला जातो. क्षयरोग औषधोपचार, पर्यवेक्षण, पाठपुरावा, शासकिय सेवेची मदत तालुका, प्रा.आ.केंद्र, उपकेद्र, ग्रामपंचायत स्तरावर आरोग्य विभागातील अधिकारी,आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका यांच्या द्वारे सेवा पुरविली जात आहे.
कोल्हापूर ग्रामीण मध्ये दरवर्षी शासकीय व खाजगी क्षेत्रातील मिळून सरासरी 2500 ते 2700 टी.बी.रुग्णांचे निदान होते. सन 2025 मध्ये 640746 लोकांचे स्क्रीनिंग करण्यात आले, त्यापैकी 141669 संशयितांची एक्सरे तपासणी केली आहे व 42618 संशयितांची नॅट तपासणी केली आहे. या तपासणी मधून 2451 इतके रुग्णांचे निदान झाले आहे.
पोषण आहारासाठी क्षयरुग्णांना दरमहा रु. 1000/- डिबीटीव्दारे बँक खात्यामध्ये औषधोपचार संपेपर्यत दिले जातात. याचबरोबर प्रधानमंत्री टी.बी.मुक्त भारत अभियान (निक्षय मित्र) या योजनेअंतर्गत संस्था, उद्योग समुह, दानशूर व्यक्ती निक्षय मित्र होऊन क्षयरुग्णांना व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना पोषण आहार कीट ची मदत करत आहेत. जानेवारी ते डिसेंबर- 2025 मध्ये 5978 पोषण आहार कीटचे वितरण क्षयरुग्णांना करण्यात आले आहे. या अभियानामध्येही निक्षय मित्रांनी केलेल्या सहकार्यामुळे “कोल्हापूर जिल्हा” राज्यात प्रथम आला आहे.
क्षयमुक्त भारत करण्याच्या उद्देशाने सुरु असलेल्या टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियाना मध्ये कोल्हापूर जिल्हा उत्कृष्ट कामगिरी करीत आहे. सन 2024 मध्ये पड़ताळणीनंतर 359 ग्रामपंचायती टीबी मुक्त ग्रामपंचायती म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. यामध्ये 50 रौप्य व 309 कास्य प्रमाणपत्र प्राप्त ग्रामपंचायतीं आहेत. यामध्ये सन 2025 मध्ये सुमारे 667 ग्रामपंचायती नामांकन करण्यासाठी पात्र झाल्या आहेत. यामध्ये सुमारे 40 ग्रामपंचायती सुवर्ण प्रमाणपत्राच्या नामांकनासाठी पात्र झाल्या आहेत.
केंद्र सरकारचे निर्दशांक जसे - क्षयरुग्णांचे निदान साध्य दर, एचआयव्हीची तापसणी, नॅट तपासणी, उपचार यशस्वीता दर, निक्षय पोषण योजनेचा लाभ, अतिजोखमग्रस्त (एम.डी.आर.) क्षयरुग्णांवरील उपचार दर व संपर्कातील पाच वर्षाखालील मुलास क्षयरोग प्रतिबंधामात्मक उपचार दिलेला दर या निर्देशांकांनुसार मूल्यमापन करून रँकिंगनुसार कोल्हापूर जिल्हयाने 92.40 % कामकाज करून प्रथम क्रमांक पटकावला आहे.