बुवाबाजीविरोधात अंनिसची निदर्शने; नाट्यप्रयोगांतून करणार जनजागृती, १२ एप्रिलला बुवाबाजी विरोधी सत्यशोधन परिषद
schedule31 Mar 26 person by visibility 106 categoryसामाजिक
कोल्हापूर : बुवाबाजी आणि अंधश्रद्धेविरोधात आज छत्रपती शाहू महाराज पुतळा, दसरा चौक येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूर करवीर शाखा यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. कार्यकर्त्यांनी घोषणा देत भोंदूगिरीविरोधात तीव्र निषेध नोंदवला.
या वेळी बोलताना महाराष्ट्र अंनिस चे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष डॉ. बी. एम. हिर्डेकर म्हणाले, "समाजात अंधश्रद्धा आणि बुवाबाजीमुळे अनेकांची फसवणूक होत असून, याविरोधात ठोस जनजागृतीची गरज आहे." वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवादी विचार समाजात रुजवण्यासाठी अशा आंदोलनांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष सुरू करण्याची मागणी केली.
दरम्यान, समितीच्या वतीने महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला. सोमवार दि. 30 मार्च पासून ते शनिवार 11 एप्रिल, महात्मा फुले जयंती पर्यंत बुवाबाजीविरोधात "ऐसे कैसे झाले भोंदू" नाट्यप्रयोगांच्या माध्यमातून प्रबोधन मोहीम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतून बुवाबाजी आणि अंधश्रद्धेचे दुष्परिणाम आणि बुवा करत असलेल्या चमत्कारांमधील विज्ञान उघड करून भोंदू बुवांची भांडाफोड प्रभावीपणे जनतेसमोर केली जाणार आहेत.
तसेच, 12 एप्रिल रोजी जोतिबा फुले यांच्या दोनशे व्या जयंती वर्षानिमित्त आणि महाराष्ट्रातील वाढत्या बुवाबाजीच्या पार्श्वभूमीवर एकदिवसीय 'बुवाबाजी विरोधी सत्यशोधक परिषद' घेण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. या परिषदेत विविध क्षेत्रातील अभ्यासक आणि कार्यकर्ते सहभागी होऊन पुढील लढ्याची दिशा ठरवणार असल्याचे सांगण्यात आले.
या सर्व उपक्रमांमधून समाजात जागरूकता निर्माण करून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी व्यापक चळवळ उभी करण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला आहे.
यावेळी महाराष्ट्र अंनिस चे राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती, राज्य कार्यवाह रेश्मा खाडे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद शिंदे जिल्हा प्रधान सचिव रामदास देसाई, दिलीप कांबळे, स्वाती कृष्णात, प्रा तेजस्विनी देसाई, राहूल शिंगे, मानसी बोळूरे, बृहस्पती शिंदे, भुवन कुलकर्णी, प्रमोद गिरी, सरदार आमशीकर, मोहसीन मोमीन, अर्शद पटणी, महादेव शिंगे, सुवर्णा तळेकर, सुनील गायकवाड, मनिषा शिंदे, रमेश आपटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.