पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी यशस्वीरीत्या संपन्न
schedule30 Mar 26 person by visibility 105 categoryराज्य
कोल्हापूर : केंद्र शासन पुरस्कृत ‘उल्लास - नव भारत साक्षरता कार्यक्रम’ (ULLAS Nav Bharat Saksharata Karyakram) अंतर्गत असाक्षरांना साक्षर करण्यासाठी राज्यभर राबविण्यात येणारी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) रविवार, दि. 29 मार्च 2026 रोजी यशस्वीरीत्या पार पडली.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सन 2022-23 ते 2026-27 या कालावधीत हा कार्यक्रम राबविण्यात येत असून, सन 2025-26 मध्ये उल्लास अॅपवर नोंदणी झालेल्या असाक्षरांसाठी ही परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांतील युडायस प्राप्त शाळांमध्ये घेण्यात आली. ही परीक्षा मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, कन्नड, तेलगू, तामिळ आणि बंगाली अशा नऊ माध्यमांतून आयोजित करण्यात आली होती.
या परीक्षेत निकषानुसार उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत प्रमाणपत्र व गुणपत्रिका देण्यात येणार आहे. या चाचणीमुळे नवसाक्षर व्यक्तींमध्ये आर्थिक, कायदेविषयक, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य जागरूकता, बालसंगोपन, शिक्षण व कुटुंब कल्याण यांसारखी जीवनावश्यक कौशल्ये विकसित होण्यास मदत होणार आहे. यापूर्वी 21 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या परीक्षेत सुमारे 5 लाख असाक्षरांनी सहभाग नोंदविला होता. तर यंदा केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात नव्याने सुमारे 1.23 लाख असाक्षर व्यक्तींची नोंदणी झाली असून, त्यापैकी सुमारे 1 लाख व्यक्तींनी FLNAT परीक्षा दिली.
या परीक्षेसाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे तसेच शालेय शिक्षण व क्रीडा राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नवसाक्षर होण्यासाठी आवाहन केले. राज्यभर परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हास्तरावर भेटी देऊन परीक्षा केंद्रांची पाहणी केली. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, डायटचे प्राचार्य, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांनी परीक्षा केंद्रांना भेट देऊन कामकाजाची पाहणी केली, अशी माहिती शिक्षण संचालनालय (योजना) चे शिक्षण संचालक तथा राज्य साक्षरतेचे सदस्य सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली.