फुटबॉल स्पर्धेच्या गोंधळावर चौकशी समिती नेमा : आप युवा आघाडीची कुलगुरूंकडे मागणी
schedule14 Feb 25 person by visibility 325 categoryक्रीडा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने फुटबॉल संघाने अनेक उत्कृष्ठ खेळाडु घडवले. परंतु काही दिवसांपुर्वी छत्रपती शाहुजी महाराज विश्वविद्यालय, कानपुर येथे अखिल भारतीय अंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ फुटबॉल संघातील काही खेळाडू तसेच एक संघ व्यवस्थापक हे अर्ध्या वाटेतून परत आले. मुंबई येथे पोहोचल्यानंतर एका प्रशिक्षकाकडून ठराविक खेळाडूंसाठी राहण्याची वेगळी सोय करण्यात आली. रेल्वेची तिकिटे न मिळणे, राहायची योग्य सोय न होणे यासारख्या गोष्टींचा विपरीत परिणाम खेळाडूंच्या मनोधैर्यावर झाला. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून शिवाजी विद्यापीठाचा संघ 8-0 अशा गोलफरकाने पराभूत होऊन परतला.
या सगळ्या प्रकाराची चौकशी करून संघ व्यवस्थापनेत झालेल्या त्रुटी सुधाराव्यात अशी मागणी आप युवा आघाडीने कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यामध्ये घडलेल्या प्रकाराची सत्यता तपासण्यासाठी चौकशी समिती गठीत करावी व सर्व खेळाडू संघ व्यवस्थापक प्रशिक्षक या सर्वांचा जबाब घेऊन घटनेसाठी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने करावी. इथून पुढच्या काळात खेळाडू अशा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी जात असताना त्यांच्या प्रवासाची व निवासाची योग्य ती सोय विद्यापीठ प्रशासनाने करावी. जर खेळाडूंसाठी रेल्वेची तिकीट मिळत नसतील तर खेळाडूंच्या सोयीसाठी विद्यापीठाने विमान प्रवासाची सोय करावी.
तसेच शिवाजी विद्यापीठ फुटबॉल संघाची निवड समिती व निवड चाचणी पद्धत यामध्ये फक्त दोनच लोकांवर अवलंबून न राहता प्रत्येक वेळी नवीन तीन लोकांची निवड समिती करावी. ही निवड करत असताना निवड चाचणी कॅम्प च्या आधी दोन ते तीनच दिवस ह्या लोकांची नावे जाहीर करावी जेणेकरून निवड प्रक्रियेत पारदर्शकता येईल व कुठलाही निर्णय एकतर्फी होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी आप युवा आघाडीचे शहराध्यक्ष मोईन मोकाशी यांनी केली.
निवड चाचणी सुरू करण्यापूर्वीच संघ व्यवस्थापक प्रशिक्षक व खेळाडू या तिन्ही घटकांना स्पष्टपणे विद्यापीठ स्पर्धा खेळण्यासाठी अनुपस्थिती दाखवल्यास कशा प्रकारची कडक कारवाई केली जाणार याचा खुलासा करावा अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
यावर कुलगुरूनी सकारात्मकता दाखवत उद्या होणाऱ्या बोर्ड ऑफ स्पोर्ट्सच्या बैठकीत वरील मुद्दे चर्चेला घेऊ व व्यवस्थापना मधील त्रुटी दूर करण्यासाठी पाऊले उचलण्याचे आश्वासन दिले.
यावेळी युवा आघाडी महासचिव दिग्विजय चिले, प्रथमेश सूर्यवंशी, उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, अदित्य पवार आदी उपस्थित होते.