अंबाई टॅंकची दुरुस्ती करा : 'आप'चे अतिरिक्त आयुक्तांना निवेदन
schedule13 Mar 25 person by visibility 157 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेचा अंबाई जलतरण तलाव गेल्या दोन वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. उखडलेल्या फरश्या, पाण्याची गळती, जीर्ण झालेला डायविंग टॉवर, फिल्टरेशन अभावी हिरवेगार होत असलेल्या पाण्याने तलावाची अवस्था बिकट बनली आहे. त्यामुळे या टॅंकची दुरुस्ती होऊन तो नागरिकांसाठी खुला करण्यात यावा या मागणीचे निवेदन आम आदमी पार्टीने अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आले.
दोन वर्षांपूर्वी चाळीस लाख खर्चून गळती काढायचे काम केले गेले. परंतु सहाच महिन्यात पुन्हा गळती लागून तलाव बंद करावा लागला. तलावात पाच ठिकाणी गळती असल्याचे महापालिकेने नेमलेल्या तज्ञांचे मत आहे. गळती काढण्यासाठी निविदाही काढलेली आहे, परंतु अद्याप काम सुरु झालेले नाही. फिल्ट्रेशन युनिट बसवण्यासाठी अंदाजपत्रकात याची तरतूद असून देखील केवळ इस्टेट विभाग आणि वर्कशॉप विभागातील समन्वयच्या अभावाने काम पुढे सरकलेले नाही.
उन्हाळा सुरु झाल्याने, तसेच शाळांना सुट्टी पडणार असल्याने या तलावाची अधिक गरज भासणार आहे. त्यामुळे पुढील एका महिन्यात तलावाची गळती काढण्यात यावी, फिल्ट्रेशन युनिटचे टेंडर त्वरित काढून ते बसवण्यात यावे, डायविंग टॉवर नवीन बांधण्यात यावा अशी मागणी आप शिष्टमंडळाने केली.
यावर अतिरिक्त आयुक्त रोकडे यांनी शहर अभियंता व इस्टेट विभाग आवश्यक सूचना देऊन कामास सुरुवात करणार असल्याचे सांगितले.
यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, समीर लतीफ, दुष्यंत माने, विजय हेगडे, रमेश कोळी, लखन मोहिते आदी उपस्थित होते.