होळी : आनंद, सौख्य, उत्साहपूर्ण सण
schedule13 Mar 25 person by visibility 176 categoryसामाजिक

मराठी वर्षातील फाल्गुन हा शेवटचा महिना. हा महिना संपला की, शालीवाहन शकाचे नवे साल सुरू होते. या सरत्या वर्षाला आनंदाने निरोप देण्यासाठी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी व दुसऱ्या दिवशी धुळवड हे सण साजरे केले जातात..
आपल्या भारत देशात प्रत्येक सण अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. होळी हा असा सण आहे ज्यात रंग आणि आनंदाची अक्षरशः उधळण केली जाते. होलिकादहन केले जाते. रंगपंचमीचा आनंद लुटला जातो. होलीकोत्सव या सणाची प्रत्येकजण वाट पाहत असतो. या सणासाठी घरोघरी विशेष तयारी केली जाते. संपूर्ण भारतात हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.
होळी किंवा होलिकोत्सव या सणाचे नाव ऐकताच मनामध्ये आनंदाची,उल्हासाची व उत्साहाची कारंजी नाचू लागतात. लहान मुले तर आनंदाने बेभान होवून जातात.
होळी हा रंगांचा सण आहे, ज्यामध्ये लहान मुलांपासून वृद्धापर्यंत सर्वजण सामील होतात आणि हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात, म्हणून या सणाला "आनंदाचा सण" असेही म्हणतात.
आपल्या भारतासारखा जगात दुसरा कोणताही देश नाही, जिथे लोक एकत्र येतात आणि कोणताही भेदभाव न करता बंधुभावाने सर्व सणांचा आनंद घेतात. हा सण प्रत्येक भारतीयांच्यादृष्टीने मुख्य आणि लोकप्रिय सण आहे, सर्व जातीधर्माचे, विविध वंशाचे लोक एकत्र येऊन हा सण प्रेमाने साजरा करतात, या सणामुळे एकमेकांबद्दल आपुलकी वाढते आणि जवळीक निर्माण होते. आपल्या देशात साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक सणांच्या मागे एक पौराणिक महत्त्व आणि त्यासोबत वैज्ञानिक दृष्टिकोन ही आहे. होळी हा सण दुर्गुणाला जाळतो, अंधश्रध्दा व अनिष्ट रूढी आणि परंपरा यांची राख करतो. यानिमित्ताने खरं तर दारिद्र्याची, अज्ञानाची व अन्यायाची होळी पेटवली पाहिजे , तेंव्हाच आनंदाची, प्रसन्नतेची व सौख्याची रंगपंचमी खेळता येईल; असा संदेश घेऊनच होळीचा सण पदार्पण करत असतो.
वसंत ऋतूच्या आगमनामुळे वसुंधरा विविध रंगांनी नटलेली असते. या आल्हाददायक वातावरणात समस्त मानवाच्या मनावरील व्यवहारी जीवनाचे दडपण ही कमी होते. भगवान श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी आणि राधा,सखी यांनी एकमेकांवर रंगांची उधळण करीत रासक्रीडा केल्याचे आपण पौराणिक ग्रंथात पाहिले आहे. भगवंताच्या लीला आणि राधेच्या विनवण्या या प्रसंगावर आधारित लोककला आणि लोकसंगीत यातून अनेक लोकगीते आपण ऐकतो आहोत. संतांनी या विषयांवर असंख्य अभंग व गवळणी रचल्या आहेत. यानिमित्ताने अविचारांना तसेच नैराश्याला जाळून वसंताच्या आगमनाचा आनंद व्यक्त केला जातो. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारी, स्वतःला विसरून बेभानपणे आनंद उपभोगू देणाऱ्या होळीने इतर सणांपेक्षा आपला वेगळा ठसा जनमानसावर उमटवला आहे. अर्थात अलिकडे होळी आणि धुळवड या दोन पवित्र सणांना ओंगळवाणे व बिभत्स स्वरूप आले आहे, त्यामुळे एकप्रकारे समाजजीवनात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या सणाच्या मागचा हेतू बाजूला पडला आहे, या सणाच्या निमित्ताने व्यसनाधीनता वाढते आहे, शिवाय चंगळवादी संस्कृती वाढतांना दिसत आहे, वास्तविक होळी किंवा होलिकोत्सव हा सण वसंत ऋतूची आपल्या संस्कृतीला लाभलेली मोठी देणगी आहे. या सणाला फार मोठे धार्मिक महत्त्व आहे, तुकाराम बीज, नाथषष्ठी, जयंत्या, उत्सव याच सणाच्या आसपास साजरे केले जातात.
होळीला अनेक नावे आहेत, हुताशनी, फाल्गुनी पोर्णिमा, कोकट होळी वगैरे नावांनी होळी साजरी केली जाते .
दुष्टांचा नाश करणं हा या सणाचा उद्देश आहे. भारतीय नागरिक एकमेकांना यानिमित्ताने शुभेच्छा देतात. तसेच यादिवशी पुरणपोळी गुळवणी व गोडधोड पदार्थ करून होळीला नैवेद्य केला जातो , प्रत्येक गावाच्या देवळासमोर चावडीसमोर होळी पेटवली जाते, आपले जीवन यज्ञेय आहे त्याची शिकवण होळीपासून मिळते. अग्नीदेवता या सणाची प्रमुख देवता आहे . या सणाच्या पंधरा दिवसात धुळवड साजरी करतात. या सणात रंगपंचमीला फार महत्त्व आहे. महाराष्ट्रात या सणाला शिमगा असेही म्हणतात होळी सणात आनंद उल्हास भरलेला असतो. पावित्र्य आणि मांगल्य यांचे मंगल दर्शन घडते, साऱ्या अनिष्ट आणि घातक परंपरा मोडून आपण होळी हा सण मोठ्या आनंदाने साजरा करणं हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे, तथापि होळीच्या निमित्ताने होणारी मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड थांबली पाहिजे आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून समाजात जी घाण कचरा किंवा घातक प्लास्टिक च्या वस्तू यांची होळी करणे हे महत्त्वाचे आहे दक्षिण भारतात या सणाला काम दहन असे म्हणतात. बंगालमध्ये दोलोत्सव म्हणतात. बिहारमध्ये बोला यात्रा असे म्हणतात, आसामात भोगली बिहू म्हणतात दक्षिणेत शिवमंदिरासमोर होळी करण्याची पद्धत आहे या सणात भारतीय संस्कृतीचे विविध दर्शन लोककला आणि लोकसंगिताच्या माध्यमातून घडविले जाते.
"देव रंगारी | त्रिभुवनाचा रंग करी ||" असा संतांनी या सणाचे वर्णन केले आहे.कोकणात प्रत्येक गावात होळीचा सण साजरा केला जातो. यावेळी मुंबईतील चाकरमानी मोठ्या संख्येने गावाकडे येतात, आणि सर्व बांधवांना एकत्र करून तीन, पाच,सात दिवस हा सण आनंदाने साजरा करतात. यानिमित्ताने कोळीगीते व लोकगीते गायिली जातात. हा सण आता केवळ हिंदूंचा राहिलेला नाही तर सर्व समावेशक झाला आहे,म्हणूनच सर्वधर्मसमभावाची आणि सौहार्दाची प्रचिती आणून देतो.हा सर सण सर्वानाच आनंददायी आहे.मनामनात आनंद, उत्साह व सौख्य भरणारा हा सण आहे. होळी सणाचे औत्सुक्य आणि आकर्षण आजच्या धकाधकीच्या जीवनात यत्किंचितही कमी झालेले नाही.
✍️ डॉ सुनीलकुमार सरनाईक
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत.)