‘टेक्नोवा’ सारख्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना : उद्योजक सारंग जाधव; डी. वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये आयोजन
schedule13 Mar 25 person by visibility 178 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : टेक्नोवा सारख्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळेल,असे प्रतिपादन सीआयआयचे दक्षिण महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष उद्योजक सारंग जाधव यांनी केले. डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निक येथे आयोजित टेक्नोवा 2025 या तांत्रिक स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून 560 विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
सारंग जाधव पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांकडे आत्मविश्वास आणि प्रेझेंटेशन स्किल्स असणे आवश्यक आहे. स्वतःला सातत्याने अपग्रेड करत राहणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. क्रिएटिव्हिटी, कोलॅब्रेशन,डिजिटल स्किल्स , टीम वर्क या गोष्टी सुद्धा यशस्वी इंजिनियर होण्यासाठी आवश्यक आहेत. कोणतेही संशोधन करत असताना ते समाजासाठी उपयुक्त ठरणे गरजेचे आहे. डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये सातत्याने विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाबरोबरच अशा प्रकारचे उपक्रम घेऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी चांगले प्रयत्न होत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
यावेळी बोलताना कार्यकारी संचालक डॉ. ए. के.गुप्ता यांनी सांगितले की, कोणत्याही स्पर्धेमधील सहभागामुळे मिळणारा आत्मविश्वास विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पूरक ठरतो. डी. वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
प्राचार्य डॉ.महादेव नरके यांनी सांगितले की, गेली दहा वर्ष सातत्याने टेक्नोवा ही स्पर्धा घेतली जाते. विद्यार्थ्यांच्या आवडीच्या आणि नवनवीन तंत्रज्ञानाशी सुसंगत स्पर्धा टेक्नोवामध्ये घेतल्या जातात. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमधील फ्री थिंकर्स क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गेल्या तीन महिन्यात 60 हून अधिक बक्षिसे मिळवल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके यांच्यासह विभाग प्रमुख आणि स्टाफ समन्वयक उपस्थित होते.
टेक्नोवा समन्वयक धैर्यशील नाईक यांनी आभार मानले. समृद्धी मेटिल हिने सूत्रसंचालन केले. चिन्मय कुलकर्णी, पियुषा केसरे यांच्यासह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.