स्वरसम्राज्ञी आशा भोसले काळाच्या पडद्याआड; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
schedule12 Apr 26 person by visibility 85 categoryसामाजिक
मुंबई : भारतीय संगीत क्षेत्रातील एक देदीप्यमान तारा निखळला आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. काल संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान अवयव निकामी (ऑर्गन फेल्युअर) झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे सात दशकांचा सुवर्णकाळ संपुष्टात आला आहे.
आशाताईंचे पार्थिव उद्या सकाळी ११ वाजेपासून लोअर परळ येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती त्यांचे पुत्र आनंद भोसले यांनी दिली.
१९३३ मध्ये जन्मलेल्या आशाताईंनी आपल्या आठ दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत हिंदीसह मराठी, बंगाली आणि तमिळ अशा विविध भाषांमध्ये १२ हजारांहून अधिक गाणी गायली. 'दम मारो दम' पासून ते अनेक भावपूर्ण गीतांपर्यंत त्यांनी प्रत्येक पिढीच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या जाण्याने संगीत विश्वाची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.