असरानी म्हणजे हुकमी मनोरंजन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ अभिनेते असरानी यांना श्रद्धांजली
schedule21 Oct 25 person by visibility 74 categoryराज्य

मुंबई : आपल्या कसदार अभिनयाने चित्रपट सृष्टीत अढळ स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणून ज्येष्ठ अभिनेते असरानी रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील. ‘असरानी’ म्हणजे हुकमी मनोरंजन अशी ख्याती त्यांनी मिळवली, अशा हरहुन्नरी अभिनेत्याचे निधन म्हणजे चित्रपट सृष्टीची मोठी हानी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
“विनोदी, ढंगदार आणि आशयघन विषयातही असरानी यांच्या भूमिका रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या ठरल्या. कसदार आणि रसरशीत अभिनय हे त्यांचे वैशिष्ट्य. त्यामुळेच त्यांचा ‘शोले’ चित्रपटातील जेलर अजरामर ठरला. हिंदी चित्रपट सृष्टी, कला क्षेत्रासाठी असरानी यांनी दिलेले योगदान निश्चितच महत्त्वपूर्ण असे राहीले आहे. यामुळेच त्यांना या क्षेत्रातील अनेक मानांकित पुरस्कार देखील मिळाले. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टी, त्यांचे निकटवर्तीय, चाहते तसेच कुटुंबियांवर आघात झाला आहे.
आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी असून, हा आघात सहन करण्याची त्यांना ताकद मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेते असरानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.