डीकेटीईकडून स्वातंत्र्यदिनानिमित्त शहीद कुटुंबीयास मदतीचा धनादेश सुपुर्त
schedule15 Aug 26 person by visibility 152 categoryशैक्षणिक
इचलकरंजी : डीकेटीईचा स्वातंत्र्य दिन हा नेहमीच विविध उपक्रमांनी मोठया उत्साहात साजरा केला जातो. यंदाचा ध्वजारोहण समारंभ हा शिरोळ तालुका टाकळीवाडी येथील वीर शहीद जवान रोहीत खन्नीकुडे यांच्या वीरपत्नी श्रीमती शशीकला रोहीत खन्नीकुडे व त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करुन शहीद जवान रोहीत खन्नीकुडे यांच्या शौर्याला अभिवादन करण्यात आले. ध्वजारोहण झालेनंतरच्या कार्यक्रमात त्यांना डीकेटीई परिवार यांच्यातर्फे हौताम्य वंदन व सैनिक परिवारास कृतज्ञतानिधी समर्पण करण्यात आला.
देशसेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणा-या वीर जवानांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून डीकेटीईने शहीद जवान रोहीत परशुराम खन्नीकुडे यांच्या कुटुंबीयांना मदतीचा धनादेश संस्थेच्या सचिव डॉ सपना आवाडे यांच्या हस्ते वीरपत्नी शशीकला खन्नीकुडे व त्यांच्या कुटुंबीयांकडे हा कृतज्ञतानिधी सुपूर्द करण्यात आला.
यावेळी बोलताना, डॉ सपना आवाडे यांनी, सीमेवर जवान अहोरात्र कर्तव्य बजावत असल्यामुळेच देशातील नागरिक सुरक्षित जीवन जगत आहेत. शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या दुःखात डीकेटीई परिवार सदैव सहभागी असून, त्यांच्या पाठीशी उभा आहे अशी भावना व्यक्त केली.
डीकेटीईने समाजाशी बांधिलकी जपत देशसेवेसाठी आपल्या बलिदानाची आहुती देणा-या महाराष्ट्रातील वीरपुत्र रोहीत परशुराम खन्नीकुडे यांना श्रध्दांजली अर्पण करीत शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबीयास कृतज्ञतानिधी दिली.
या कार्यक्रमास संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. एल.एस.आडमुठे, उपसंचालक डॉ.यु.जे. पाटील, सोशल विभागाचे डॉ ए.आर.बलवान, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यासह हुतात्मा खन्नीकुडे कुटुंबीयांचे सदस्य उपस्थित होते.