गणेश विसर्जनावेळी निर्माल्यासाठी प्लास्टिक पिशवीचा वापर टाळा
schedule11 Sep 26 person by visibility 107 categoryमहानगरपालिका
◼️निर्माल्य स्वतंत्रपणे जमा करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे महापालिकेचे आवाहन
कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विसर्जनासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तीला अर्पण केलेली फुले, हार, दुर्वा, पाने आदी निर्माल्य प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून विसर्जनस्थळी आणू नये, असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
गणेशमूर्ती विसर्जनावेळी निर्माल्य नदी, तलाव किंवा विसर्जन कुंडामध्ये प्लास्टिक पिशवीसह टाकल्यामुळे जलप्रदूषण होण्याबरोबरच कचरा व्यवस्थापनाची समस्या निर्माण होते. तसेच जलचर आणि पर्यावरणावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे नागरिकांनी निर्माल्य व प्लास्टिक कचरा स्वतंत्र ठेवून विसर्जनस्थळी उपलब्ध करून देण्यात आलेल्या निर्माल्य संकलन केंद्रांमध्ये निर्माल्य स्वतंत्रपणे जमा करावे.
गणेशमूर्ती विसर्जनासाठी येताना निर्माल्य वाहून नेण्यासाठी नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा. त्याऐवजी कापडी पिशवी, कागदी पिशवी किंवा अन्य पर्यावरणपूरक साधनांचा वापर करावा. संकलन केंद्रांवर जमा करण्यात आलेले निर्माल्य महापालिकेच्या वतीने स्वतंत्रपणे संकलित करून त्याची योग्य पद्धतीने प्रक्रिया व विल्हेवाट करण्यात येणार आहे.
नागरिकांनी फुले, हार, दुर्वा, नारळ, पाने आदी निर्माल्य विसर्जनाच्या पाण्यात न टाकता निर्धारित निर्माल्य संकलन केंद्रातच जमा करावे. तसेच प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल, प्लास्टिक सजावटीचे साहित्य व अन्य कचरा पाण्यात अथवा विसर्जनस्थळी टाकू नये.
निर्माल्य स्वतंत्र जमा करूया – प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करूया” या उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून गणेशोत्सव हा श्रद्धेबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा उत्सव ठरवावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक कोल्हापूर घडविण्यासाठी गणेश विसर्जनावेळी निर्माल्यासाठी प्लास्टिक पिशवीचा वापर टाळून महापालिकेच्या निर्माल्य संकलन व्यवस्थेस सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.