“सत्यजित चषक २०२६”चा बादशहा एफसी (पुणे) मानकरी
schedule23 Feb 26 person by visibility 78 categoryक्रीडा
🟠 संयुक्त वडार समाज, यादवनगर संघाला उपविजेतेपद
कोल्हापूर : पाटाकडील तालीम मंडळ पुरस्कृत खण बॉईज आयोजित “सत्यजित चषक २०२६” फुटबॉल स्पर्धेततील अंतिम सामन्यात पुणे येथील बादशहा एफसी संघाने संयुक्त वडार समाज, यादवनगर फुटबॉल संघाचा ट्रायब्रेकर वर पराभव करून “सत्यजित चषक २०२६” वर नाव कोरले. विजेत्या बादशहा एफसी संघाला ५५ हजार रुपये आणि चषक तर उपविजेत्या संयुक्त वडार समाज, यादवनगर संघाला २१ हजार रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात आले.
पश्चिम महाराष्ट्रातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या या टर्फ स्पर्धेत एकूण ३२ संघांनी सहभाग घेतला. टिकी टाका टर्फ येथे स्पर्धा झाली. स्पर्धेतील अंतिम सामन्याची सुरुवात शिवसेनेच्या उपनेत्या, माजी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव, उपमहापौर अक्षय जरग, अश्किन आजरेकर, ओंकार जाधव, सयाजी साळोखे, सुजय हिलगे यांच्या हस्ते झाली. अंतिम सामना अत्यंत चुरशीने खेळायला गेला. मध्यंतरापर्यंत गोल शून्य बरोबरीत असलेल्या सामन्यात बादशहा एफ सी,पुणे संघाने ट्रायब्रेकरवर विजेतेपद पटकावले.
विजयी संघाला शिवसेनेच्या उपनेत्या, माजी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे समालोचन विजय साळोखे यांनी केले, तर आभार रोहन ठोंबरे यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खण बॉईजच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.