शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात पेटला आंदोलनाचा वणवा; २१ हजार एकर जमिनीचा घास घेणाऱ्या प्रकल्पाविरोधात ९ जूनला बळीराजाचा महामोर्चा
schedule19 May 26 person by visibility 150 categoryराज्य
कोल्हापूर : नियोजित शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे अस्तित्व धोक्यात आणणाऱ्या शासनकर्त्यांविरोधात कोल्हापुरात आता निर्णायक युद्धाचे रणशिंग फुंकले गेले आहे. कसबा बावडा येथील श्रीराम सोसायटी सभागृहात पार पडलेल्या धगधगत्या सर्वपक्षीय शेतकरी मेळाव्यात, सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीला चोख उत्तर देण्याचा वज्रनिर्धार करण्यात आला. "आम्ही लाठ्या खाऊ, तुरुंगात जाऊ, पण आमच्या हक्काची जमीन या विनाशकारी प्रकल्पासाठी कदापि देणार नाही," असा थेट आणि आक्रमक इशारा काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिला. हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताचा नसून केवळ सत्ताधाऱ्यांना आर्थिक बळ देणारा असल्याचा घणाघाती आरोप करत त्यांनी आगामी ९ जून २०२६ रोजी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर 'न भूतो न भविष्यती' असा ऐतिहासिक विराट मोर्चा काढण्याची घोषणा केली.
या एल्गाराला अधिक धार देण्यासाठी २५ मेपर्यंत गावोगावी ग्रामसभा घेऊन महामार्गाविरोधात ठराव मंजूर करण्याचे आणि जास्तीत जास्त लेखी हरकती नोंदवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या महामार्गामुळे राज्यातील १३ जिल्ह्यांतील तब्बल २१ हजार एकर सुपीक जमीन नष्ट होणार असून, त्यातील १६ हजार एकर जमीन ही कोल्हापूर-सांगली पट्ट्यातील अत्यंत सुपीक बागायती जमीन असल्याचा धक्कादायक दावा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. या प्रकल्पामुळे कोल्हापूर परिसरातील महापुराची भीषणता आणखी वाढून येथील संपूर्ण साखर उद्योगच उद्ध्वस्त होईल, अशी भीती व्यक्त करतानाच शेट्टी यांनी प्रकल्पाचा खर्च ८६ हजार कोटींवरून थेट १.१५ लाख कोटींवर गेल्याचा आरोप करत यातील कथित भ्रष्टाचारावर कडाडून प्रहार केला.
मेळाव्यात उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांनी आणि हजारो शेतकऱ्यांनी या लढ्याला दीर्घकालीन संघर्षाचे स्वरूप देण्याचा इशारा दिला असून, "जमिनीच्या सर्व्हेसाठी पाय ठेवणाऱ्यांना 'कोल्हापुरी हिसका' दाखवून त्यांचा योग्य पाहुणचार केला जाईल," असा सज्जड दमही प्रशासनाला दिला आहे. हा महामार्ग ज्यांच्या मतदारसंघातून जाणार आहे, त्या पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आपली संशयास्पद शांतता मोडून तात्काळ भूमिका स्पष्ट करावी आणि चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करणे थांबवावे, अशी आक्रमक मागणीही या मेळाव्यातून करण्यात आली.
आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार के. पी. पाटील, संपतराव पवार-पाटील यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याने ९ जूनच्या महामोर्चासाठी आता गावोगावी व्यापक जनजागृतीची मशाल पेटवली आहे.