अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सतर्क रहा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश
schedule18 Aug 25 person by visibility 72 categoryराज्य

कोल्हापूर : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता एस. जी. मुंगीलवार, कागल राधानगरी उपविभागाचे उप विभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढत असून हवामान खात्याने 17 ते 21 ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही सतत पाऊस पडत आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे. राधानगरी व काळम्मावाडी धरणातून विसर्ग सुरु असून नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना वेळेत सूचित करावे. अतिवृष्टी परिस्थितीत नदीकाठचे नागरिक, ग्रामस्थ यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या सूचना वेळेत पोहोचवा, अशा सूचना देऊन दररोज पडणाऱ्या पावसाचे प्रमाण, धरणातून होणारा विसर्ग, नद्यांची पाणी पातळी, अलमट्टीतून होणारा सध्याचा विसर्ग आदी विषयांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.
जिल्हाधिकारी अमोल येडगे व जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे यांनी अतिवृष्टीच्या अनुषंगाने प्रशासनाच्या तयारी बाबत माहिती दिली.