आठवणींना उजाळा, मैत्रीला नवा श्वास : कोरे; अभियांत्रिकी २००० बॅचचा रौप्यमहोत्सव
schedule28 Dec 25 person by visibility 101 categoryशैक्षणिक
वारणानगर : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमस), वारणानगर येथे १९९६ ते २००० या कालावधीत अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेल्या २००० बॅचच्या विद्यार्थ्यांचा रौप्यमहोत्सवी माजी विद्यार्थी मेळावा अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. पंचवीस वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी व प्राध्यापकांनी महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देत मैत्रीचे नाते नव्याने दृढ केले.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, वारणेत शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी केवळ चार वर्षांसाठी नव्हे तर आयुष्यभरासाठी वारणा परिवाराशी जोडले जातात. तात्यासाहेब कोरे यांचे ‘नवा माणूस घडवण्याचे’ स्वप्न आज कोणत्याही भाषा, राज्य वा देशाच्या मर्यादेपलीकडे पोहोचले आहे.
कोणतेही नवीन अभ्यासक्रम, उपक्रम किंवा सूचना मांडण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचे वारणेत नेहमीच स्वागत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास प्रा. के. बी. प्रकाश, प्रा. शेडेकर व प्रा. डी. डी. शिंदे उपस्थित होते.
या मेळाव्यास देश-विदेशात विविध क्षेत्रांत कार्यरत असणारे शासकीय, निमशासकीय अधिकारी, संशोधक तसेच उद्योजक असे १३० पेक्षा अधिक माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
अनेकांनी आपल्या यशोगाथा, संघर्षाचे अनुभव व संस्थेबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. या अनुभव कथनामुळे कार्यक्रम अधिक प्रेरणादायी आणि भावस्पर्शी ठरला.
कार्यक्रमास वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन. एच. पाटील, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कार्जींनी, प्राचार्य डॉ. डी. एन. माने व अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. त्यांनी संस्थेची शैक्षणिक वाटचाल, नव्या उपक्रमांची दिशा आणि माजी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.
या मेळाव्याचे यशस्वी आयोजन माजी विद्यार्थी समिती समन्वयक प्रा. बी. आर. बागणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. डॉ. विवेक शेटे, प्रा. अनिल फल्ले, प्रा. अमर पाटील, प्रा. महेश भोसले तसेच २००० बॅच कार्यकारिणी अध्यक्ष विद्यानंद गावडे व उपाध्यक्ष कीर्ती कुलकर्णी यांच्यासह संपूर्ण मुख्य संयोजन समितीने नियोजन, समन्वय, नोंदणी, संपर्क व व्यवस्थापनाच्या सर्व टप्प्यांवर मोलाची भूमिका बजावली.
त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच हा मेळावा यशस्वीपणे पार पडला, असे यावेळी नमूद करण्यात आले.
मुख्य कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व आठवणी मनोगताच्या स्वरूपात मांडल्या आणि सर्व माजी विद्यार्थी तसेच मार्गदर्शक प्राध्यापक व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचालन प्रा. गणेश कांबळे, प्रा. मिलिंद कामत, रितू गावडे व वैष्णवी भोकरे यांनी केले, तर आभार डॉ. के. आय. पाटील यांनी मानले.





