कोल्हापूर: भुदरगडमधील घरफोडीचा गुन्हा २४ तासांत उघड; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चोरट्यास केली अटक
schedule26 Apr 26 person by visibility 75 categoryगुन्हे
कोल्हापूर : अनफ बुद्रुक (ता. भुदरगड) येथे झालेल्या घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांनी अवघ्या २४ तासांत उघडकीस आणला आहे. या कारवाईत पोलिसांनी ४०,५२० रुपये किमतीच्या मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेतले आहे.
२३ ते २४ एप्रिलच्या दरम्यान फर्जाना फयाज शेख यांच्या बंद घराचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी तपासाचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कागल-मुरगुड रोडवरील पाटबंधारे कार्यालयाजवळ सापळा लावला.
यावेळी पोलिसांनी बाबू राजू शेख (वय २७, रा. निपाणी, जि. बेळगाव) याला संशयास्पदरित्या ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे सोन्याच्या बाली, चांदीच्या बांगड्या, इमिटेशन ज्वेलरी, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ४०,५२० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी मुद्देमालासह आरोपीला भुदरगड पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली.