राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान अंतर्गत ग्रंथभेट योजनेसाठी ग्रंथ सादर करण्याचे आवाहन
schedule23 Jan 26 person by visibility 48 categoryराज्य
कोल्हापूर : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने समान निधी ग्रंथभेट योजनेअंतर्गत सन 2025 या कॅलेंडर वर्षात प्रकाशित झालेल्या मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील ग्रंथांची खरेदी करून ते राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना भेट स्वरूपात वितरित करण्यात येणार आहेत.
या योजनेअंतर्गत खरेदीसाठी ग्रंथांची निवड तसेच ग्रंथालय संचालनालयामार्फत प्रसिद्ध होणाऱ्या शासनमान्य ग्रंथ निवड यादीत समावेशासाठी, सन 2025 (1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025) या कालावधीत प्रकाशित व प्रथम आवृत्ती असलेल्या ग्रंथांची प्रत्येकी एक विनामूल्य प्रत (Complimentary Copy) ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई–400001 यांच्याकडे दि. 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत सादर करावी. दि. 28 फेब्रुवारीनंतर प्राप्त होणाऱ्या ग्रंथांचा ग्रंथ निवड यादीसाठी विचार केला जाणार नाही. तसेच सन 2025 मध्ये प्रकाशित झालेले व यापूर्वी ग्रंथालय संचालनालयाकडे पाठविण्यात आलेले ग्रंथ पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नाही.
याशिवाय मुद्रण व नोंदणी अधिनियम, 1867 अन्वये मुद्रकाने व ग्रंथ प्रदान अधिनियम, 1954 अन्वये प्रकाशकाने प्रत्येकी एक प्रत राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, नगर भवन, मुंबई तसेच शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे व नागपूर येथे पाठविणे आवश्यक आहे. संबंधित ग्रंथालयांकडून ग्रंथ प्राप्तीची पोचपावती घेऊन ती ग्रंथालय संचालनालयाकडे ग्रंथासोबत, टपालाद्वारे किंवा समक्ष सादर करावी. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व लेखक व प्रकाशकांनी आपल्या ग्रंथांच्या प्रती विहित मुदतीत पाठवाव्यात, असे आवाहन ग्रंथालय संचालकांनी केले आहे.