डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या ‘वज्र’ उपकरणाला राष्ट्रीय स्तरावर प्रथम पारितोषिक
schedule23 Jan 26 person by visibility 148 categoryराज्य
कोल्हापूर : भारत सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘किसान क्वेस्ट’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानी तयार केलेल्या ‘वज्र’ उपकरणाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याचबरोबर किसान प्रदर्शन २०२५ मध्ये टीम वज्रला “फार्मर्स चॉईस अवॉर्ड” ने सन्मानित करण्यात आले.
‘किसान क्वेस्ट’ या प्रतिष्ठित स्पर्धेत देशभरातून ६०० हून अधिक संघांचा सहभाग होता. स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या यश पेटकर, राजऐश्वर्या सावंत आणि वेदांत चिलबुले (टीम वज्र) यांनी डॉ. अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या वन्य प्राणी प्रतिबंधक ‘वज्र’ ने सर्वांचेच लक्ष वेधून घेत प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल त्यांना ६०,००० रुपयांचे रोख बक्षीस प्रदान करण्यात आले.
सध्या वन्यप्राणी विशेषतः अन्न व पाण्याच्या शोधात जंगल सोडून मानवी वस्तीकडे येत असल्यामुळे शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला आहे. या समस्येवर प्रभावी उपाय म्हणून हे नाविन्यपूर्ण प्रतिबंधक उपकरण विकसित केले आहे.
हे उपकरण तीन टप्प्यांत कार्य करते. कोणताही वन्यप्राणी जवळ येताच ते त्याच्या हालचाली व चालण्यामुळे निर्माण होणाऱ्या कंपनांचा शोध घेते. त्यानंतर अनुक्रमे मोठा आवाज, धूर आणि तीव्र प्रकाश प्राण्याच्या दिशेने टाकला जातो, ज्यामुळे प्राणी घाबरून त्या ठिकाणाहून पळून जातो.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा आणि रजिस्ट्रार डॉ. व्ही. व्ही. भोसले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. हे उपकरण वन्यप्राण्याना प्रतिबंध करण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल. त्यामुळे विशेषत: शेतकऱ्याना मोठा दिलासा मिळू शकेल असा विश्वास विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केला.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आणि डी. वाय. पाटील कृषी तंत्र विद्यापिठाचे प्र कुलपती ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, संचालक डॉ. अजित पाटील आणि विभागप्रमुख डॉ. जी. व्ही. ओतारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.