SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
वारकरी भाविकांना अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‘झिरो ब्युरोक्रसी’कडे शासनाची वाटचाल; प्रशासनाने ‘स्टार्टअप’सारखे काम करावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसरुई येथे पंचगंगा नदीत बुडालेला यड्रावचा तरुण मृतावस्थेत आढळला‘डीकेटीईच्या मेकॅनिकलमधील विद्यार्थ्यांची टेस्ला या जगविख्यात कंपनीमध्ये भक्कम कामगिरी’कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कारदिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन नरके यांचे मार्गदर्शनभारतीय लोकशाहीचा पोलादी आराखडा: राष्ट्रीय नागरी सेवा दिनकोल्हापूर जिल्ह्यातील २९ हजार कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होणार; शासकीय जमिनीवरील २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमानुकूल होणारराधानगरी तालुक्यातील अवसायनात संस्थांच्या सुनावणीस गती द्या : अभिजीत तायशेटे, संचालक, गोकुळ दूध संघ कोल्हापूर येथील नियोजित फिश मार्केटला आवश्यक मदत व निधी देऊ : मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे

जाहिरात

 

वारकरी भाविकांना अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

schedule21 Apr 26 person by visibility 134 categoryराज्य

◼️पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई : आषाढी वारी काळात निघणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी दोन्ही पालखी मार्गावरील पालखीतळे अधिक चांगली व सुविधायुक्त करण्यात यावीत, वारकरी भाविकांना अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी तसेच पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  दिले.

पालखी मार्गांवरील विश्रामस्थळ सुविधा निर्मिती संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल आदी यावेळी उपस्थित होते.

पुणे विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सादरीकरणाद्वारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील विविध विकास कामांची माहिती दिली.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील विविध विकास कामांसाठी सुमारे १३०३ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यापैकी ९६४ कोटी रुपये मंजूर झाले असून त्यातील ९५९ कोटी रुपये खर्च झाले आहेत. या आराखड्यांतर्गत दोन्ही पालखी मार्गातील पालखीतळांच्या ठिकाणी स्वच्छतागृहांसाठी सेफ्टी टँक, कमानीचे बांधकाम करणे, जमीन सपाटीकरण करणे, हायमास्ट पोल उभारणे, संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे, रस्त्यांची दुरुस्ती, पालखी कट्टा तयार करणे आदी कामांपैकी बहुतांश कामे पूर्ण झाली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, यंदा २५ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान ८ जुलै रोजी तर श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान ७ जुलै रोजी होणार आहे. दोन्ही पालखी मार्गावर वारकरी भाविकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी. पालखी सोहळ्याच्या विश्वस्तांशी चर्चा करून त्यांना आणखी कोणत्या सुविधा हव्यात त्या करून द्याव्यात. पालखी तळावर कायमस्वरुपी पायाभूत सुविधांची कामे करावीत. पालखी तळावर वारकऱ्यांसाठी गेल्या वर्षी हँगरची व्यवस्था करण्यात आली होती, त्या प्रमाणे यंदाही अतिरिक्त हँगरची व्यवस्था करावी. पालखी मार्गावरील महामार्गांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत.

पुलकुंडवार म्हणाले की, पालखी मार्गावरील विकास कामे पूर्ण करण्यात येत असून यावर्षी वारकऱ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घेतली आहे. गेल्या वर्षी दोन्ही पालखी मार्गावर ३७०० मोबाईल शौचालये पुरविण्यात आली होती. यंदा ५ हजार मोबाईल शौचालये पुरविण्याचे नियोजन आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने दोन्ही पालखी मार्गावरील महामार्गाची कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत. दिवेघाट ते हडपसर आणि बारामती ते इंदापूर मार्गांची कामे सुरू आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव पराग जैन,  सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई रवींद्रन, सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस., मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्री महोदय यांचे सचिव राजेश देशमुख, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes