100 दिवसीय क्षयरोग मोहिमेच्या पडताळणीसाठी केंद्रीय पथकाची भेट
schedule13 Feb 25 person by visibility 248 categoryआरोग्य

कोल्हापूर : जिल्ह्यात 7 डिसेंबर 2024 ते 17 मार्च 2025 पर्यंत 100 दिवसीय क्षयरोग मोहीम सुरु आहे. या मोहिमेमध्ये अतिजोखमीचे गट व असुरक्षित भाग, संस्था यांची क्षयरोग निदानासाठी तपासणी सर्वेक्षण व निक्षय शिबिरे घेतली जात आहेत. तसेच जनभागीदारी व कॅम्पेन ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.
या मोहिमेच्या कामकाज पडताळणीसाठी केंद्रीय पथकाने उपकेंद्र वाशी ता. करवीर व प्राथमिक आरोग्य केंद्र, पुलाची शिरोली येथे भेट दिली. या समितीमध्ये डॉ.विवेकानंद गिरी, सह संचालक सार्वजनिक आरोग्य व उप पोर्ट आरोग्य अधिकारी, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार हे या पथकाचे मुख्य सदस्य असून जागतिक आरोग्य सल्लागार डॉ. चेतन हांडे या पथकामध्ये सहभागी होते.
या पथकाने उपकेंद्र वाशी येथे 100 दिवशीय क्षयरोग मोहिमेची पडताळणी केली व कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेले पथनाट्य, रांगोळी स्पर्धा असे उपक्रम राबवण्यात आले. टीबी.चॅम्पियन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. वाशी गावचे उपसरपंच यांनीही आरोग्य विभागाच्या कामकाजाबद्दल विशेष आभार मानले. समुदाय आरोग्य अधिकारी अनिल गंबरे यांनी मोहिमेबाबत सादरीकरण केले.
यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने, वैद्यकीय अधिकारी डी. टी.सी. डॉ.माधव ठाकूर, वाशीच्या उपसरपंच सीमा पाटील नंदवाळचे सरपंच अमर कुंभार, आप्पासो हजारे, मुख्याध्यापक, विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका व एसटीएस एसटीएलएस उपस्थित होते.
मोहिमेअंतर्गत पथकाने सावली केअरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किशोर देशपांडे यांची भेट घेतली व तेथील निक्षय शिबिरास भेट दिली. यावेळी 136 व्यक्तींचे स्क्रीनिंग करण्यात आले. यावेळी डॉ. देशपांडे यांनी आरोग्य कर्मचारी यांचे नेहमीच सहकार्य असल्याची माहिती पथकास दिली.
यानंतर या पथकाने प्राथमिक आरोग्य केंद्र पुलाची शिरोली येथे भेट दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ.जेसिका अँड्रूस यांनी या मोहिमेच्या कामकाजाबाबत सादरीकरण केले. तसेच पथकातील सदस्यांच्या हस्ते क्षयरुग्णांना फूड बास्केट वितरण केले. सायटीबीची टेस्ट करण्यात आली. टीबी होऊन गेलेल्या व्यक्ती म्हणजेच टीबी चॅम्पियन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सी.एच.ओ.पंकज पाटील यांनी तयार केलेली छोटीसी क्षयरोग जनजागृतीपर रील यावेळी दाखवण्यात आली. पथकाने 100 दिवसीय कामकाजाबाबत जसे मोहिमेचे नियोजन, निक्षय शिबिरे सर्वेक्षण, प्रयोगशाळा, एक्स-रे कामकाज, कोणत्या घटकाची तपासणी केली जाते याची पूर्ण पडताळणी केली व जनभागदारी उपक्रम याचीही पडताळणी केली.
यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, वैद्यकीय अधिकारी डी. टी.सी. डॉ.माधव ठाकूर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद दातार, डॉ. विंदा बनसोडे, राहुल शेळके, समुदाय आरोग्य अधिकारी, आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी एसटीएस, एसटीएलएस उपस्थित होते. येथील एकूण कामकाजाबाबत पथकाने समाधान व्यक्त केले.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्तिकेयन एस., आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांच्या मार्गदर्शनाने व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांच्या सक्षम नियोजनानुसार 100 दिवशीय क्षयरोग मोहीम जिल्ह्यात सुरु असून याबाबतच्या एकूण कामकाजाबाबत केंद्रीय पथकाने समाधान व्यक्त केले.