मालवण येथील मोदींच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला
schedule27 Aug 24 person by visibility 255 categoryदेश
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नौदल दिनानिमित्त मालवण-राजकोट येथे आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळला. ही घटना दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेची माहिती मिळताच शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर तहसीलदार, पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते.
दरम्यान, आमदार वैभव नाईक यांनी राजकोट येथे भेट देत पाहणी केली. या घटनेचा तीव्र निषेध करून उध्दव ठाकरे गटाचे आम. नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर संताप व्यक्त करीत कार्यालय फोडले. दरम्यान, छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या या घटनेचा शिवप्रेमींकडून निषेध व्यक्त करण्यात आला.
🔸️पुतळा पुन्हा उभारणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
घटना अतिशय दुर्दैवी आहे, छत्रपती शिवाजी महाराज है महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि आमची अस्मिता आहे. हा पुतळा नौदलाने उभारला होता. या घटनेचाबत मी जिल्हाधिकायांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी ४५ किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहत होता. त्यामुळे पुतळ्याचे नुकसान झाल्याचे सांगितले. पुन्हा तिथे महाराजांचा पूर्णाकृती पुतळा दिमाखात उभारला जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
🔸️महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यासह घटनास्थळी भेट देणार : आमदार सतेज पाटील
राजकोट येथील घटनेचा आढावा घ्यायला व पुढील दिशा ठरवण्यासाठी एक शिवप्रेमी म्हणून आमदार सतेज पाटील मंगळवारी सकाळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यासह मालवण येथे घटनास्थळी भेट देणार आहे.
🔸️घाई केल्याने पुतळा कोसळला : संभाजीराजे
पुतळा उद्घाटन करण्यासाठी घाई केल्यानेच पुतळा कोसळला, अशी टीका माजी खासदार संभाजीराजे यांनी केली. उशीर होऊ दे, पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बाधणी झाली पाहिजे. आता त्याठिकाणी पुनश्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचे आहे.
🔸️कोल्हापुरात आघाडीची निदर्शने
कोल्हापूर : मालवण येथील राजकोट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे कोसळल्याने महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उफाळून आली. या घटनेच्या विरोधात कोल्हापुरातील महाविकास आघाडीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निदर्शने करण्यात आली.
याप्रसंगी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादी शहराध्यक्ष आर. के. पोवार, शिवसेना उपनेते संजय पवार, शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे, माजी नगरसेवक राजू लाटकर, रियाज कागदी, महेश उत्तुरे, रियाज सुभेदार, प्रताप जाधव, सरफराज रिकीबदार, जय पटकारे, संजय पटकारे, झकीर मुल्ला, ईश्वर परमार, भारती पोवार, दिलीप पोवार, रघुनाथ कांबळे, तौफिक मुल्लाणी, दीपक थोरात, अक्षय शेळके, मुबीन मुश्रीफ, आदी सहभागी झाले होते.