मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनीला भेट
schedule23 Nov 25 person by visibility 49 categoryराज्य
नागपूर : मध्य भारतातील शेतकऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या आणि नागपुरात मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या ॲग्रोव्हिजन-2025 या कृषी प्रदर्शनीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दुपारी भेट दिली. या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रदर्शनीतील कृषी उत्पादने आणि पूरक उद्योगांच्या दालनांची पाहणी करून शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहिती जाणून घेतली.
अमरावती मार्गावरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरातील ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनीच्या कार्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात या प्रदर्शनीचे प्रणेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, बारामती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार, ॲग्रोव्हिजन फाऊंडेशनचे अध्यक्ष रवी बोरटकर तसेच ॲग्रोव्हिजन सल्लागार परिषदेचे चेअरमन डॉ. सी.डी. मायी हे मान्यवर उपस्थित होते.
ॲग्रोव्हिजनची ही आतापर्यंतची सोळावी प्रदर्शनी आहे. याशिवाय फाऊंडेशनला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृषी प्रदर्शनीतील विविध संस्था आणि कंपन्यांच्या दालनांना भेट दिली. विशेषतः मुख्यमंत्र्यांनी शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहिती जाणून घेतली.