डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवरील अमानुष अत्याचाराची गंभीर दखल
schedule23 Nov 25 person by visibility 55 categoryराज्य
▪️ पीडित कुटुंबाला 10 लाखांची मदत : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार आणि निर्घृण हत्येची घटना अत्यंत गंभीर, संतापजनक व मानवतेला काळिमा फासणारी आहे. या घटनेमुळे पीडित कुटुंबावर झालेली मानसिक, सामाजिक व भावनिक हानी अपरिमित असून, शासनामार्फत पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून 10 लाख रुपयांची तत्काळ मदत मंजूर करण्यात आली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
संबंधित घटनेची माहिती मिळताच प्रशासनाला कुटुंबाच्या मदतीसाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार मनोधैर्य योजनेअंतर्गत रू.10 लाख इतकी आर्थिक मदत पिडीत बालिकेच्या कुटुंबाला देण्यात येत आहे.
मंजूर मदत ही केवळ तत्काळ दिलासा देणारी असून वास्तविक झालेली हानी कोणत्याही आर्थिक सहाय्याने भरून न येणारी आहे. तथापि, या कठीण प्रसंगी शासन त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहे, असे मंत्री आदिती तटकरे यांनी नमूद केले.
यापुढील काळात या प्रकरणाच्या तपास प्रक्रियेत आवश्यक समन्वय, कायदेविषयक मार्गदर्शन, पुनर्वसनासंदर्भातील सहाय्य, तसेच पीडित कुटुंबाच्या रक्षण आणि हिताविषयीच्या सर्व आवश्यक उपाययोजना करण्यासाठी महिला व बालविकास विभाग पूर्णतः कटिबद्ध असून, संबंधित यंत्रणांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.