कोरे सैनिकी शाळेच्या कमांडंटपदी कर्नल आर. बी. पाटील यांची नियुक्ती
schedule04 May 25 person by visibility 487 categoryशैक्षणिक

नवे पारगाव : येथील श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ, वारणानगर संचलित तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी, विनयनगर नवे पारगाव या कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव अनुदानित सैनिकी शाळेच्या कमांडंटपदी निवृत्त कर्नल आर. बी. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी स्वतः ही नियुक्ती जाहीर केली, तर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही.कारजिन्नी यांनी औपचारिक नियुक्तीची घोषणा करून कर्नल पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला.
एका विशेष समारंभात झालेल्या या नियुक्तीप्रसंगी कर्नल आर. बी. पाटील यांनी संस्थेच्या ध्येय-धोरणानुसार वाटचाल करून सर्वांच्या सहकार्याने सैनिक शाळेचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कारजिन्नी, म्हणाले, "कर्नल पाटील यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तीची नियुक्ती झाल्याने आमच्या सैनिकी शाळेची गुणवत्ता आणखी वाढेल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रशिक्षण मिळेल यात शंका नाही."
या नियुक्ती व सत्कार समारंभास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी, प्राचार्य टी. बी. ऱ्हाटवळ, डॉ. कलाधरन यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी कर्नल पाटील यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या प्रगतीची आशा व्यक्त केली.
तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी ही महाराष्ट्रातील नावाजलेली संस्था असून, दरवर्षी इथून अनेक विद्यार्थी राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि भारतीय सशस्त्र दलांत प्रवेश करतात. या संस्थेमधून आतापर्यंत शेकडो अधिकारी भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात उच्च पदांवर कार्यरत आहेत.