सिनेमाच्या प्रभावी मांडणीत दिग्दर्शकाची जबाबदारी महत्वाची : रिची मेहता; ‘बिहाइंड द फ्रेम : मास्टरिंग द आर्ट ऑफ द सिनेमा’ चर्चासत्र
schedule04 May 25 person by visibility 182 categoryराज्य

मुंबई : सिनेमामध्ये एखाद्या विषयावर मांडणी करताना दिग्दर्शकाचा दृष्टीकोन जसा आहे त्याच पद्धतीच्या फ्रेममधून दिग्दर्शक सिनेम प्रेक्षकापर्यंत नेतो. आपल्या सिनेमातून नेमका काय संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे याची जबाबदारी दिग्दर्शक म्हणून खूप महत्वाची असते, असे प्रतिपादन रिची मेहता यांनी केले.
बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये आयोजित वेव्हज २०२५ दृकश्राव्य आणि मनोरंजन समिट मध्ये ‘बिहाइंड द फ्रेम : मास्टरिंग द आर्ट ऑफ द सिनेमा’ या विषयावर आयोजित मास्टरक्लासमध्ये रिची मेहता बोलत होते.
रिची मेहता म्हणाल्या की, सिनेमा अत्यंत प्रभावी माध्यम असून त्याचा योग्य वापर करून दिग्दर्शक आपल्या विषयाला निश्चितच परिणामकारक पद्धतीने एकाचवेळी देश-विदेशात पोहचवू शकतो. स्वानुभवातून निर्माण झालेले कथानक, विषयसूत्र हे अधिक सशक्तपणे मांडता येतात, जे प्रेक्षकांनाही सहजतेने भावतात. नाटक, काल्पनिक कथानक यावर आधारित सिनेमा कोणत्याही माध्यमातून व्यक्त केल्या जाणाऱ्या आशयाची प्रामाणिकता, सत्यता ही ठळकपणे बघणाऱ्यांच्या लक्षात येते, हे लक्षात घेऊन अधिक संवेदनशीलतेने भोवतालच्या घटना, प्रसंग यांच्याकडे बघता आले पाहिजे.
सिनेमा आणि वेबसिरीज यांच्या विषयांच्या मांडणीमध्ये तसेच प्रेक्षकवर्गामध्ये फरक असतो. सिनेमामध्ये विषय, पात्र आणि त्याची मांडणी यांचा प्राधान्यक्रम वेगळा असतो आणि वेबसिरीजमध्ये हे घटक सिनेमासारख्या क्रमाने येत नाही तर तिथे ते वेगळ्या पद्धतीने येतात, दोन्ही माध्यमे प्रभावी असून त्याचा सुयोग्य वापर करून दिग्दर्शक आपल्या विषयाला निश्चितच परिणामकारक पद्धतीने व्यापक प्रमाणात समाजापर्यंत पोहचवू शकतो, असे रिची मेहता यांनी सांगितले.