पुरोगामी महाराष्ट्रात काँग्रेसची विचारधारा : काँग्रेस नेते राहुल गांधी; सांगली येथे डॉ. पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा अनावरण व लोकतीर्थ स्मारक लोकार्पण
schedule05 Sep 24 person by visibility 452 categoryदेश
सांगली : "महाराष्ट्र एक पुरोगामी राज्य आहे. येथील लोकांनी देशाला दिशा दिली. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिशा दाखवण्याचे काम केले. महाराष्ट्रात काँग्रेसची मुळे खूप खोलवर रुतलेली आहेत. महाराष्ट्राच्या डीएनएमध्ये काँग्रेसची विचारधारा आहे. त्यामुळे जेव्हा-जेव्हा इथे येतो, तेव्हा मला हा आमच्या विचारधारेचा गड असल्याची जाणीव होते," असे प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले.
सांगली येथे माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा अनावरण व लोकतीर्थ स्मारक लोकार्पण सोहळा खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते झाला. क्या प्रसंगी झालेल्या सभेत ते बोलत होते
भाजपवर जोरदार निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले की सत्ताधारी पक्षाला निवडक लोकांना पुढे न्यायचे आहे. हे लोक जातव्यवस्थेला खतपाणी घालण्याचे काम करत आहेत. जातीला दुसऱ्या जातीशी लढवतात, द्वेष पसरवतात.
सावरकरांच्या मुद्यावरून मोदींनी केलेल्या टीकेला राहुल गांधी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी राहुल गांधी म्हणाले, चुकीचे काम करणारे माफी मागतात. चुक केली नाही तर माफी मागायची वेळच येत नाही. त्यामुळे चुकीचा जीएसटी, नोटाबंदी बाबत माफी मागा, तरुणांना रोजगार देऊ शकलो नाही म्हणून माफी मागा, असे म्हणत पीएम मोदींवर राहुल यांनी निशाणा साधला आहे. आम्हाला द्वेषाचं राजकारण करायचं नाही तर प्रेमाचं आणि एकीचं राजकारण आम्हाला हवंय, असेही खासदार राहुल गांधी यांनी जाहीर सभेमध्ये स्पष्ट केले.
दरम्यान सोनहिरा साखर कारखाना परिसरात डॉ. पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा व लोकतीर्थ स्मारक उभारले आहे. या स्मारकामध्ये भव्य बगिचा व सभागृह साकारले आहे. या स्मारक खासदार राहुल गांधी यांच्याहस्ते लोकार्पण झाले. यावेळी काँग्रे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार छत्रपती शाहू महाराज ,आमदार विश्वजीत कदम, यांच्यासह राज्यातील महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते.