सर्वसामान्यांच्या जीवनात विकासरूपी सप्तरंगांची उधळण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबीय, कार्यकर्त्यांसह साजरी केली धुळवड
schedule14 Mar 25 person by visibility 130 categoryराज्य

मुंबई : राज्यातील महायुती सरकार विकासकामातून आणि जनकल्याण योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात आनंदाच्या सप्तरंगाची उधळण करीत असून राज्यातील जनतेच्या आयुष्यात सुखाचे आणि समृद्धीचे दिवस येवोत, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॅारिशस सरकारच्यावतीने सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांच्यामुळे भारताचा जगात नावलौकिक वाढत आहे. ही तमाम भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले.
ठाणे येथील निवासस्थानी कुटुंबियासमवेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नैसर्गिक रंगांची उधळण करत धुलीवंदनाचा सण साजरा केला. यावेळी पत्नी लता, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली, नातू रूद्रांश यांच्यासह कार्यकर्ते, माध्यमांचे प्रतिनिधी, पोलिस यांच्यासोबत धुळवड साजरी केली.
धुलीवंदन हा सण सर्वांनी पर्यावरणपूरक पध्दतीने आणि नैसर्गिक रंगांच्या साथीने साजरा करावा असे आवाहन करत उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. धुळवड खेळताना रासायनिक रंग टाळून नैसगिक रंगांचा वापर करावा. पर्यावरणाचा समतोल राखणे आपले कर्तव्य असून काल होळी साजरी करताना महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होवो अशी भावना व्यक्त केल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.
महाराष्ट्रात सणांची परंपरा असून राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवनात सुखाचे, समृद्धीचे सप्तरंगाची उधळण होवो अशा शुभेच्छा दिल्या. विरोधकांना होळीच्या शुभेच्छा देतानाच त्यांनी सरकारच्या विकासाच्या विविध रंगात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबरोबरच त्यांच्या निवासस्थानी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपासून ते बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रंग लावत धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या.
परंपरेनुसार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी टेंभी नाक्यावरील आनंदआश्रम येथे जावून धर्मवीर आनंद दिघे यांच्या तैलचित्राला रंग लावून त्यांना अभिवादन केले. तसेच आनंदाश्रम येथे जमलेल्या असंख्य शिवसैनिक आणि नागरिकांसोबत धुळवड साजरी केली.