रंकाळा प्रदूषणमुक्तीच्या नावाखाली १२ कोटींचा ढपला पाडण्याचा घाट; शिवसेनेचा संतप्त सवाल - 'बहुतेक कोल्हापुरात एलियन्स आले की काय?'
schedule26 Aug 26 person by visibility 181 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर शहराचा 'नेकलेस' म्हणून तयार केलेल्या ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या सौंदर्यीकरण आणि प्रदूषणमुक्तीच्या नावाखाली चक्क १२ कोटी रुपयांचा ढपला पाडण्याचा घाट घातला जात असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूरचे माजी जिल्हाप्रमुख रविकिरण विष्णुपंत इंगवले यांनी केला आहे. "बहुतेक कोल्हापुरात एलियन्स आले की काय?", असा संतप्त सवाल करत त्यांनी प्रशासकीय व राजकीय भ्रष्टाचारावर कडाडून हल्लाबोल केला आहे.
राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा असलेल्या आणि सायंकाळी मोतीचा हार भासणाऱ्या रंकाळ्याच्या विकासाला आमचा कधीही विरोध नाही, परंतु विकासाच्या नावाखाली स्वतः 'गब्बरसिंग' होण्याचे जनप्रतिनिधींचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही, असा इशारा इंगवले यांनी दिला आहे.
रंकाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रेनेजचे पाणी येत असून जलपर्णी वाढत आहेत. त्यावर मूळ उपाय म्हणून 'एस.टी.पी. प्लांट' (Sewage Treatment Plant) उभारणे गरजेचे असताना, अधिकारी व जनप्रतिनिधी संगनमताने निधी खाण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
रंकाळ्यात आयुर्वेदिक औषध टाकून तलाव पूर्णपणे प्रदूषणमुक्त होणार असल्याचा दावा केला जात असून, १२ कोटींचे हे टाकल्यावर हा बनाव रचला जात आहे. मुळात एस.टी.पी. प्लांट नसताना असा घाट हाणून पाडला पाहिजे, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.
जोपर्यंत रंकाळा बचाव समिती किंवा प्रदूषणमुक्त करणारे तज्ज्ञ अधिकारी वर्गाला आयुर्वेदिक औषधाचा यशस्वी डेमो दाखवत नाहीत, तोपर्यंत महानगरपालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना मलई खाण्यासाठी काम करू देणार नाही, असा सज्जड दम शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.