कोल्हापूर महापालिकेच्यावतीने विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या जिमवर सीलची कारवाई
schedule13 Nov 26 person by visibility 42 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : शहरातील विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या आस्थापनांविरोधात कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने कारवाई सुरू आहे. महापालिकेच्या परवाना, घरफाळा, विभागीय कार्यालय क्रमांक 1 (गांधी मैदान) आणि उपद्रव शोध पथकाच्या संयुक्त पथकाने जरगनगर येथील योगेश्वरी कॉलनी जगतापनगर परिसरात कारवाई करून विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या जॅग्वार जिमवर कारवाई करुन सील करण्यात आले. तसेच या पसिरातील ओयो लॉजिंग या विनापरवाना व्यवसाय धारकांस 6 दिवसाची नोटीस देण्यात आली.
आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या निर्देशानुसार, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त उज्वला शिंदे व करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
शहरातील विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या आस्थापनांना नवीन व्यवसाय परवाना घेणे तसेच आवश्यक भाडेकरार सादर करण्याबाबत यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, संबंधित आस्थापनांनी नोटिसांची दखल घेऊन आवश्यक कार्यवाही केली नसल्याने अखेर महापालिकेने सीलबंदची कारवाई केली.
महानगरपालिका क्षेत्रातील घरफाळा मिळकतधारक व व्यावसायिकांना थकीत घरफाळा भरणे, कर आकारणीतील त्रुटींची दुरुस्ती करणे तसेच व्यवसाय परवाना घेण्याबाबत नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू आहे. यापुढेही विनापरवाना व्यवसाय, घरफाळा थकबाकी आणि कर आकारणीतील त्रुटींबाबत व्यापक स्वरूपात कारवाई करण्यात येणार आहे.
तरी सर्व मिळकतधारक व व्यावसायिकांनी आपल्याकडील थकीत रक्कम तातडीने भरावी. तसेच आवश्यक व्यवसाय परवाने व कागदपत्रांची पूर्तता करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
ही कारवाई परवाना अधीक्षक दत्तप्रसाद माजगावंकर, उपद्रव शोध पथकाचे जवान विलास पाटील, संतोष रानमाळे, शिवाजी कुंभार, परवाना निरिक्षक शिवाजी कोकरे, उदय भोसले, घरफाळा लिपीक संतोष आवळे, सागर गायकवाड, प्रविण भोसले, चंदू पाटील तसेच घरफाळा, परवाना आणि विभागीय कार्यालय क्रमांक 1 मधील कर्मचाऱ्यांनी केली.