महाज्योतीच्या माध्यमातून ३१ विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वितरण
schedule06 Nov 26 person by visibility 52 categoryराज्य
◼️आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी डिजिटल सुविधा
कोल्हापूर : इतर मागास बहुजन कल्याण विभाग, कोल्हापूर व महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यांच्या संयुक्त विद्यमाने ४ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील ३१ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोफत टॅबचे वितरण करण्यात आले. इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील एकूण ३५ विद्यार्थ्यांची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण घेता यावे तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी डिजिटल सुविधा उपलब्ध व्हावी, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक सुनीता नेर्लीकर होत्या. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वितरण करण्यात आले. महाज्योतीमार्फत शिक्षण व स्पर्धा परीक्षांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा प्रत्येक विद्यार्थ्याने लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती सुनीता नेर्लीकर यांनी केले. यावेळी करिअर पॉइंट प्रशिक्षण संस्थेचे प्रतिनिधी सचिन साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना टॅबच्या वापराबाबत मार्गदर्शन केले. उपस्थित विद्यार्थी व पालकांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास इतर मागास बहुजन कल्याण विभाग, कोल्हापूरचे अधिकारी अमित घवले, निरीक्षक दीपक पाटील, महाज्योती प्रादेशिक कार्यालय, कोल्हापूरच्या प्रादेशिक समन्वयक स्नेहल पाटील तसेच करिअर पॉईंट प्रशिक्षण संस्थेचे सचिन साळुंखे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे गृहपाल व्ही. एन. कांबळे यांनी तर अधिकारी गटाचे अमित घवले यांनी उपस्थितांचे आभार मानले.