सीपीआर मध्ये नोकरीचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या समाज माध्यमावरील पोस्ट, बातमीवर विश्वास ठेऊ नका : जिल्हाधिकारी अमोल येडगे
schedule22 Jan 25 person by visibility 164 categoryराज्य
कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर येथे नोकरीच्या अमिषाने दोघांना जिल्हाधिकारी व अधिष्ठाता यांच्या बोगस सहीने नियुक्तीपत्रे दिल्याची बाब निदर्शनास आली आहे, अशा प्रकारची कोणतीही नियुक्तीपत्रे देण्यात आलेली नाहीत. जिल्ह्यातील नागरीकांनी सीपीआरमध्ये नोकरीचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या समाज माध्यमावरील कोणत्याही पोस्ट, बातमीवर विश्वास ठेऊ नये. तसेच या प्रकारच्या कोणत्याही व्यक्तिगत फसवणुकीला बळी पडू नये, अशी बाब निदर्शनास आल्यास जिल्हा प्रशासनाशी तसेच पोलीस यंत्रणेशी संपर्क साधून रितसर तक्रार दाखल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर येथे लिपीक व शिपाई पदाच्या नोकरीच्या अमिषाने दोघांना जिल्हाधिकारी व अधिष्ठाता यांच्या बोगस सहीने नियुक्तीपत्रे दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
शासकीय अथवा निमशासकीय सेवेमध्ये नियुक्तीबाबत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार विहित कार्यपध्दतीचा अवलंब करुन विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये पदभरती करण्यात येते.
सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. प्रनिमे 1222/प्र.क्र.54/का. 13-अ दिनांक 04 मे. 2022 मधील तरतुदीनुसार जिल्हास्तरीय पदे (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सरळ सेवेने भरण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा निवड समितीची स्थापना करुन जिल्हा निवड समिती मार्फत वर्ग-3 व वर्ग -4 संवर्गाची पदभरती प्रक्रिया राबविण्यात येते. शासन निर्णयातील निर्देशानुसार जिल्हास्तरावरील निवड समितीचे पदसिध्द अध्यक्ष हे जिल्हाधिकारी आहेत.
महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक प्रानिमं 1222/ प्र.क्र. 136/का-13-अ, दिनांक 21 नोव्हेंबर, 2022 अन्वये भुतपुर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कक्षेबाहेरील) सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरीता टी.सी.एस-आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व आय.बी.पी.एस. (इंस्टिट्युट ऑफ बॅंकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपन्यांमार्फत ऑनलाईन पध्दतीने (Computer Based Test) स्पर्धा परीक्षा घेण्याकामी शासनाने परवानगी दिलेली आहे.
जिल्हा स्तरावरील वर्ग-3 व वर्ग 4 संवर्गातील रिक्त पदे भरताना महाराष्ट्र शासनाकडील शासन निर्णयातील निर्देशानुसार संबंधित विभागाचा आकृतीबंध अंतिम झाल्यानंतर उक्त नमूद कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करुन जिल्हा निवड समितीमार्फत जाहिरात प्रसिध्दीअंती रिक्त पदभरती करीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येतात.
विहित मुदतीत नोंदणीकृत परीक्षार्थी यांची कोल्हापूर जिल्ह्यातील ऑनलाईन परीक्षा केंद्रावर नियुक्त कंपनीमार्फत कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा घेण्यात येवून प्राप्त गुणांकनानुसार निवड यादी प्रसिध्द करुन उमेदवारास विहित पध्दतीचा अवलंब करुन रिक्त पदावर रितसर नियुक्ती देण्यात येते, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे.