‘गोकुळ’चे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांना अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
schedule21 Jan 25 person by visibility 195 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) चे कार्यकारी संचालक योगेश गोपाळ गोडबोले यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयामध्ये पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता –‘अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे सामाजिक आणि आर्थिक अध्ययन (२००८-२०१८)’ त्यांनी आपल्या संशोधनाद्वारे दूग्ध व्यवसायातील उत्पादकांच्या आर्थिक स्थिती, सामाजिक स्तर, व शाश्वत विकास या मुद्द्यांवर सखोल अभ्यास केला आहे. त्यांच्या प्रबंधाने दूग्ध व्यवसायातील उत्पादनक्षमतेत सुधारणा व दूध उत्पादकांच्या जीवनमान उन्नतीसाठी मार्गदर्शनाचा उपयोग होणार आहे.
अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यातील दूग्ध उत्पादकांना अधिक चांगल्या धोरणांचा लाभ देण्यासाठी त्यांचे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यावेळी माहिती देताना योगेश गोडबोले म्हणाले, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून आर्थिक शास्त्र विषयात पीएच.डी. पूर्ण केल्याचा मला आनंद वाटतो. या प्रवासात मला माझे मार्गदर्शक डॉ. माधव एच. शिंदे यांचे मार्गदर्शन आणि आर. बी. नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर येथील उत्कृष्ट संशोधन सुविधांचा उपयोग मला झाला.
त्याचबरोबर गोकुळ संघातील बऱ्याच योजनांच्या आणि सुविधांच्या अभ्यासामुळे, मी अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यातील दूग्ध उत्पादकांसाठी धोरणात्मक शिफारसी सुचवू शकलो, ज्या त्यांच्या उत्पादनक्षमतेत सुधारणा, शाश्वत आर्थिक विकास आणि जीवनमान उन्नतीसाठी उपयुक्त ठरू शकतील. यामध्ये मला माझ्या कुटुंबीयांचे, मित्रांचे व सहकाऱ्यांचे सतत पाठबळ लाभले. त्याबद्दल मी या सगळ्यांचा आभारी आहे. भविष्यात दूग्ध व्यवसाय आणि आर्थिक विकास क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यास मी उत्सुक आहे.
यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, सर्व संचालक मंडळाने व कर्मचारी बंधूनी त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन केले.