गजेंद्र प्रतिष्ठानकडून विद्यापीठास आबा देशपांडे यांच्या स्मरणार्थ देणगी
schedule07 Jan 26 person by visibility 201 categoryसामाजिक
कोल्हापूर : येथील गजेंद्र प्रतिष्ठानकडून प्रसिद्ध उद्योजक कै. अरविंद गजानन तथा आबा देशपांडे यांच्या स्मरणार्थ एक लाख रुपयांची देणगी शिवाजी विद्यापीठास देण्यात आली.
देशपांडे यांच्या भगिनी तथा मांजरी (पुणे) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. स्नेहल श्रीकांत जोशी (पूर्वाश्रमीच्या रेखा देशपांडे) यांनी हा धनादेश प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या उपस्थितीत कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला.
डॉ. जोशी या शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या माजी विद्यार्थिनी आहेत. आबा देशपांडे यांच्या पर्यावरण प्रेमास अनुसरून त्यांनी त्यांच्या स्मरणार्थ एक लाख रुपयांची देणगी विद्यापीठास दिली. या देणगीच्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजातून वनस्पतीशास्त्र अधिविभागातील पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी प्रसिद्ध केलेल्या उत्कृष्ट संशोधन लेखास ‘बेस्ट रिसर्च पेपर’ पारितोषिक देण्यात यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सदर पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्याने विभागाच्या लीड बॉटेनिकल गार्डनमध्ये किमान एक रोप लावून त्याचे संवर्धन करणे बंधनकारक असेल, अशी महत्त्वाची अटही त्यांनी घातलेली आहे.
यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, अधिविभागाचे प्रमुख डॉ. निखिल गायकवाड यांच्यासह अधिविभागातील शिक्षक, संशोधक उपस्थित होते.

