डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटमध्ये 'वंदे मातरम'च्या 150व्या वर्षपूर्तीनिमित्त भव्य सोहळा उत्साहात
schedule08 Nov 25 person by visibility 43 categoryशैक्षणिक
कोल्हापूर: भारतीय संस्कृती, स्वातंत्र्य आणि देशभक्तीचा जयघोष करणाऱ्या “वंदे मातरम्” राष्ट्रगीताच्या 150व्या वर्षपूर्तीनिमित्त श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कोल्हापूर येथे भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. इन्स्टिट्यूटच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
सोहळ्यानिमित्त विशेष संदेश देताना " वंदे मातरम राष्ट्रगीत हे निव्वळ मातृभूमीचे अभिमान बाळगावे असे संचित नसून सांस्कृतिक आणि राष्ट्रीय एकात्मतेची अस्मिता आहे. स्वातंत्र्ययुद्धादरम्यान या गीताने स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणा दिली असून येत्या पिढ्यांना राष्ट्रप्रेमाचे संस्कार वंदे मातरम करीत राहील. 150 वर्षे होऊनही आज हे गाणे प्रत्येक भारतीयाच्या मनात ताजे आहे " असे गौरवोद्गार प्राचार्य साळुंखे यांनी व्यक्त केले. यावेळी आयोजित गटगायन स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या देशभक्तीपर गीतांचे गायन केले.
" वंदे मातरम - राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक " या विषयावर आयोजित निबंध स्पर्धेमध्ये सहभागींनी राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्य आणि एकात्मतेच्या मूल्यावर आपले विचार मांडले . डिजिटल पोस्टर आणि लोगो डिझाईन स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ' वंदे मातरम ' मध्यवर्ती कल्पना ठेवून रंगरचना आणि विचारांची एकत्रित सांगड घालून विविध डिझाइन्स तयार केले. या सर्व स्पर्धांच्या माध्यमातून तरुणाईतील देशभक्ती कला आणि सर्जनशीलतेचा संगम दिसून आला.
" वंदे मातरम हा भारताचा अखंड ठेवा असून, पिढ्यानपिढ्या उदात्त ध्येय भावना बाळगण्यासाठीचा दीपस्तंभ आहे. कोणत्याही काळात तमाम भारतीयांना वंदे मातरम हा एक ऊर्जास्रोत आहे " असे विचार संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी यांनी व्यक्त केले. प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी प्रेरणादायी भाषणात विद्यार्थ्यांना देशभक्ती, एकता आणि राष्ट्रीय गौरव यांची जाणीव ठेवण्याचा संदेश दिला. त्यांनी सांगितले की, “वंदे मातरम् हे गीत केवळ राष्ट्रगीत नसून ते भारतीय आत्म्याचे प्रतीक आहे, जे आपल्या प्रत्येकाच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित करते.”
सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी , उपस्थित मान्यवरांनी कॉरिडॉरमध्ये उभे राहून एकत्रितपणे “वंदे मातरम् " चे गायन करून कार्यक्रमाचा समारोप झाला. संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने दुमदुमला.
संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी लाभले. कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन प्रा. साहिल एस. जमादार आणि एन एस एस समन्वयक प्रा. सुरज ए. गायकवाड यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, संघभावना आणि राष्ट्रनिष्ठा निर्माण करण्याचा उद्देश या कार्यक्रमाद्वारे साध्य झाला.