कोल्हापुरात बायोगॅस प्रकल्प व पंपसेटचा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण
schedule07 Nov 25 person by visibility 154 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : स्वच्छ भारत मिशन 2.0 योजनेअंतर्गत केंद्र शासन, राज्य शासन व महापालिकेच्यावतीने कसबा बावडा घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी नव्याने उभारण्यात आलेल्या 20 टिपीडी क्षमतेच्या बायोगॅस प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री ना.प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आज करण्यात आला. त्याचबरोबर महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान (जिल्हास्तर) सन 2023-24 मधील शिंगणापूर पंपिग स्टेशन येथील पुर्ण झालेल्या नविन पंपसेटचे लोकार्पण व सन 2025-26 मधील शिंगणापूर नागदेववाडी येथे नविन पंपसेट बसविण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री प्रकाश आबिटकर व खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते आज करण्यात आला.
यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षिरसागर, आमदार अमल महाडीक, प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थिती हा कार्यक्रम घेण्यात आला.
बायोगॅस प्रकल्पाच्या कार्यक्रमाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बोलताना या प्रकल्पाचे काम हे शहरासाठी महत्वाचे आहे. याबद्दल मी महापालिकेचे अभिनंदन करतो. शहरात रस्ते, पाणी आणि स्वच्छता हे महत्वाचे आहे. या प्रकल्पामुळे शहरातील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. बायोगॅसह अन्य उपायोजना केल्या पाहिजेत. जसा हा प्रकल्प शहरासाठी फायदेशीर आहे. तसा हा प्रकल्प या परिसरातील नागरीकांना कसा फायदेशीर होईल हे पाहिले पाहिजेल. स्वच्छतेसंदर्भात जितके शक्य आहे तितके काम महापालिकेने करावे. शहराचे पाणी, रस्ते व स्वच्छता या विषयी सध्या महापालिकेच्यावतीने गतीने कामे सुरु आहेत. याचा फायदा शहरातील नागरीकांना मिळणार आहे. आमदार राजेश क्षिरसागर, आमदार अमल महाडीक यांच्यासह अन्यही लोकप्रतिनिधींच्या विकासाच्या काही संकल्पना असतील तर त्या पुर्ण केल्या जातील. लोकप्रतिनिधी म्हणून प्रशासनावर काही वेळेस कामाच्या बाबतीत केवळ आक्षेप घेतले जातात असे होता कामा नये. महापालिका आणि शहरासाठी आंम्ही लोकप्रतिनीधी काय देतो हे सुध्दा समोर येणे अपेक्षित आहे. यासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे. शहराच्या विकासासाठी जे काही उपक्रम राबविता येतील, जे काही आवश्यक असेल ते केले जाईल. नागरीक केवळ टिका करत नसून प्रशासनाकडून चांगले कामाचेही कौतुक करतात असे त्यांनी सांगितले.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी बोलताना घनकचरा व्यवस्थानाचा प्रश्न संपूर्ण जगाला भेडसावत आहे. देशपातळीवर तसेच महापालिका स्तरावही यावर अनेक उपाय योजना करण्याचा प्रयत्न सुरु आहे. झूम प्रकल्प येथील सध्यस्थिती आणि पुर्वीस्थीती यामध्ये कमालीचा बदल झाला आहे. पुर्वी येथे भयानक स्थिती होती. या परिसरातील नागरीक त्रस्त होते. भटकी कुत्री, जनावरांचा त्रास होता. आता येथील स्थिती बदललेली आहे. याबद्दल महापालिका प्रशासनाचे कौतुक व अभिनंदन करतो. मित्राच्या माध्यमातून पुढील दोन वर्षामध्ये राज्यातील घनकचरा व्यवस्थापनाबद्दल भरीव कामगिरी केली जाईल. तसेच शहरातील विकास कामांसाठी भरीव निधी दिलेला आहे. रंकाळा येथे सेल्फी पाँईटसाठी दोन कोटी निधी दिला आहे. एकूणच शहरात आता विकास होत आहे असे त्यांनी सांगितले.
सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांनी प्रस्तावणामध्ये प्रकल्पांची सर्व माहिती दिली तर आभार अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी मानले. यावेळी अतिरिक्त शिल्पा दरेकर, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता निवास पोवार, मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील, शाखा अभियंता अरुण गवळी, कनिष्ठ अभियंता अनुराधा वांडरे व कर्मचारी उपस्थित होते.
📌शिंगणापूर रॉ वॉटर पंपिग स्टेशन प्रकल्पासंदर्भातील माहिती
शिंगणापूर रॉ वॉटर पंपिग स्टेशन येथे स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)2.0 अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेच्या बायोगॅस प्रकल्पास शासनाच्या नगर विकास विभागाकडून दि.6 मार्च 2024 नुसार रु 4,41,61,883/- रक्कमेसाठी प्रशासकीय मान्यता झाली आहे. या योजनेनुसार 33 टक्के केंद्र शासन, 33 टक्के राज्य शासन व 33 टक्के महानगरपालिका असा वित्तीय आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. या बायोगॅस प्रकल्पाची क्षमता 20 टन प्रतिदिन असून ठेकेदार प्लॅनेट एनवोर्मेन्ट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना दिनांक 09 सप्टेंबर 2024 रोजी वर्क ऑर्डर देण्यात आलेली आहे.