कोल्हापूर तावडे हॉटेलजवळील धोकादायक स्वागत कमान जमीनदोस्त
schedule07 Nov 25 person by visibility 69 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील गेली २८ वर्षे शहरात येणाऱ्या सर्वांचे स्वागत करणारी तावडे हॉटेलजवळील स्वागतकमान अखेर गुरुवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास जमीनदोस्त करण्यात आली.
रात्री ११ वाजता प्रत्यक्षात पाडकामाला सुरुवात झाली. त्यानंतर मात्र दोन्ही पोकलँडनी शहर आणि महामार्गाच्या बाजूने पहिल्यांदा पिलरच्या मधील भाग पाडून टाकला. त्यानंतर फक्त पिलर शिल्लक राहिले. नेमक्या पिलरना धक्का देत असताना १२ वाजता शहराकडूनचा डावा भाग वरून कोसळला. त्यानंतर पाचच मिनिटांत संपूर्ण कमान जागेवरच पाडण्यात कामगारांना यश आले.
या कालावधीमध्ये वाहतूक पोलिसांच्या मदतीने तावडे हॉटेलमार्गे कोल्हापुरात येणारी वाहतूक उचगावमार्गे वळविण्यात आली होती, तर शहरातून तावडे हॉटेलमार्गे बाहेर जाणारी वाहतूक छत्रपती ताराराणी चौकातून बावडा रोडने शियेमार्गे वळवण्यात आली होती.
या मोहिमेसाठी दोन पोकलँड, ३ जेसीबी, १८ टिपर, बूम १, ३५ कामगार, फ्लड लाईट असलेली एक जीप, जनरेटर, गॅस कटर इतकी यंत्रणा यासाठी वापरण्यात आली. पहाटेपर्यंत सर्व मलबा हटवून वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.