डिजिटल युगात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ई-कन्टेन्ट अपरिहार्य ; अभिजित रेडेकर
schedule07 Jan 26 person by visibility 155 categoryशैक्षणिक
कोल्हापूर: डिजिटल युगात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ई-कन्टेन्ट अपरिहार्य असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या संगणक विभागाचे संचालक अभिजित रेडेकर यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र आणि अंतर्गत गुणवत्ता हमी सेल (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने पी.एम.-उषा अंतर्गत“डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ ई-कन्टेन्ट फॉर ऑनलाईन अँड मूक्स” या विषयावर आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी बहुविद्याशाखीय विद्याशाखा अधिष्ठाता प्रा.डॉ.अजय साळी होते.
श्री. रेडेकर पुढे म्हणाले की, ई-कन्टेन्ट विकासाचे कौशल्य प्रत्येक शिक्षक व विद्यार्थ्याने आत्मसात करणे अत्यावश्यक आहे. आजच्या काळात तंत्रज्ञान साक्षरता ही मूलभूत गरज बनली असून, स्वयं व महा-स्वयं या प्लॅटफॉर्मवर सक्रिय सहभाग घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. डिजिटल शिक्षणामुळे पारंपरिक शिक्षणाच्या संकल्पनांमध्ये मोठा बदल घडून येत असून, या बदलत्या परिस्थितीत विद्यार्थी-केंद्रित ई-कन्टेन्ट निर्मिती ही काळाची गरज बनली आहे,
अध्यक्षीय भाषणात डॉ. साळी म्हणाले की, भविष्यात शिक्षण घेण्यासाठी केवळ वर्गखोलीची आवश्यकता उरणार नाही, अशी मानसिकता निर्माण होत आहे. बदलती पिढी डिजिटल शिक्षणाकडे वेगाने वळत असून, त्यासाठी प्रभावी, परिणामकारक आणि गुणवत्तापूर्ण ई-कन्टेन्ट तयार करणे अत्यंत आवश्यक आहे.
पहिल्या सत्रात अहिल्यानगर येथील नॉलेज ब्रीज फाउंडेशनचे प्रशिक्षक श्री. भूषण कुलकर्णी म्हणाले की, आजच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला पाहिजे. डिजिटल साधने समजून घेणे व ती कुशलतेने हाताळणे ही आजची शैक्षणिक गरज आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व भूमिका डॉ. नितीन रणदिवे यांनी मांडली. पाहुण्यांची ओळख नाझिया मुल्लाणी, सूत्रसंचालन डॉ. नगिना माळी, तर आभार प्रदर्शन संदीप थिटे यांनी केले. यावेळी उपकुलसचिव विनय शिंदे, प्रा.डॉ.नितीन माळी, डॉ.चांगदेव बंडगर,डॉ.सुर्यकांत गायकवाड, डॉ.राम चट्टे, प्रा.कांचन खराडे, डॉ.प्रमोद कोळी, डॉ. किशोर खिल्लारे, डॉ.करीम मुल्ला, डॉ.रोहिणी भोसले तसेच मोठ्या संख्येने शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

