SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जलसंवर्धन, नदी पुनरुज्जीवन आणि पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज : डॉ. राजेंद्र सिंहकोल्हापूर जिल्हा शल्यचिकित्सक औषध भांडारात औषधांचा साठा नियमानुसार उपलब्‍ध असून जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना औषधांचा पुरवठा सुरळीत सुरुकनवाड व कुटवाड येथील आरोग्य शिबिरात ५७७ नागरिकांची तपासणीकोल्हापूर : विनापरवाना व्यवसाय व घरफाळा थकबाकीप्रकरणी वॉटर फ्रंट अपार्टमेंटमधील ७ आस्थापने सीलहॉटेल्स, हॉस्पिटल्स व व्यापारी संकुलांच्या बांधकामांची कोल्हापूर महापालिकेकडून होणार तपासणीटीकेआयईटीमध्ये 'वारणा सायबर सुरक्षा कवच क्लब'चे दिमाखदार उद्घाटनफुलेवाडीत ३० ऑक्टोबरपासून भव्य ‘फुलेवाडी महोत्सव’; विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजनगोकुळच्या नूतन संचालक मंडळाचा पाटील कुटुंबीयांच्या वतीने सत्कार८३ व्या वर्षीही अखंड भाषासेवा!पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना ९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

जाहिरात

 

जलसंवर्धन, नदी पुनरुज्जीवन आणि पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज : डॉ. राजेंद्र सिंह

schedule22 Oct 26 person by visibility 129 categoryसामाजिक

🔵 शिवाजी विद्यापीठात जलसंवर्धन आणि अहिंसक विकासावर विशेष व्याख्यान; पर्यावरण संवर्धनासाठी लोकचळवळ उभारण्याचे आवाहन

कोल्हापूर : शाश्वत विकासासाठी जलसंवर्धन, जंगलांचे संरक्षण आणि पर्यावरणीय परिसंस्थेचे जतन करणे ही काळाची गरज आहे. पर्यावरणाचे संरक्षण करणे हा विवेक आहे, तर पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरणे ही विकृती आहे. त्यामुळे नव्या पिढीला निसर्ग संवर्धनासाठी तयार करण्याबरोबरच शेतकरी व नागरिकांमध्ये जलसाक्षरता निर्माण करण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन प्रसिद्ध जलतज्ज्ञ आणि ‘जलपुरुष’ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले.

शिवाजी विद्यापीठातील गांधी अभ्यास केंद्र, कॉ. दत्ता देशमुख अध्ययन केंद्र आणि नेहरू अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (२२ ऑक्टोबर) आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. ‘जलसंवर्धनाच्या माध्यमातून विकास : महात्मा गांधी आणि अहिंसक विकास’ हा व्याख्यानाचा विषय होता. विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. (डॉ.) माणिकराव साळुंखे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

◼️जलसंवर्धनासाठी विद्यापीठाचे कार्य दिशादर्शक
डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले की, शिवाजी विद्यापीठाने आपल्या परिसरात जलसंवर्धनाचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याबरोबरच उपलब्ध संसाधनांचा विवेकी वापर करण्याचे उदाहरण विद्यापीठाने निर्माण केले आहे. मात्र, शाश्वत विकासाची प्रक्रिया एका दिवसात पूर्ण होत नाही. त्यासाठी अनेक वर्षे सातत्याने प्रयत्न करावे लागतात. पाण्याचे संवर्धन, जंगलांचे संरक्षण आणि पर्यावरणीय परिसंस्थेचे जतन यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील विवेक जागृत करण्याची गरज अधोरेखित करत ते म्हणाले, की नव्या पिढीला निसर्ग आणि संस्कृतीच्या जतनासाठी तयार केले पाहिजे. शेतकरी आणि नागरिकांना जलसाक्षर करण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा. पर्यावरणविषयक लोकचेतना जागृत करून जलसंवर्धनाचे कार्य समाजाच्या व्यापक सहभागातून पुढे नेले पाहिजे.

◼️नद्यांना प्रदूषणापासून वाचवा; काँक्रीटीकरण टाळा
नद्यांच्या संवर्धनाविषयी बोलताना डॉ. सिंह यांनी नदीप्रणालीचे नैसर्गिक स्वरूप जपण्याचे आवाहन केले. नद्यांना प्रदूषणापासून वाचवणे आणि त्यांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. नद्यांचे नैसर्गिक प्रवाहक्षेत्र आणि पर्यावरणीय रचना अबाधित ठेवण्याऐवजी त्यांच्या काठावर सिमेंट-काँक्रीटच्या भिंती उभारून आपण नद्यांच्या नैसर्गिक व्यवस्थेला हानी पोहोचवत आहोत, असे त्यांनी नमूद केले. पंचगंगा नदीच्या संदर्भातही प्रदूषण नियंत्रण, नदीसंवर्धन आणि शास्त्रीय पद्धतीने जलव्यवस्थापन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

अल निनोच्या संभाव्य संकटाविषयी सावध करताना ते म्हणाले की, या हवामानविषयक घटनेचे स्वरूप समजून घेऊन त्यानुसार उपाययोजना करणे आवश्यक आहे. वेळीच नियोजन केले नाही, तर भविष्यात मोठ्या संकटांना सामोरे जावे लागू शकते. स्थलांतरात वाढ होण्याबरोबरच अन्नधान्य उत्पादन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकचेतना जागृत करून जलस्रोतांचे संरक्षण आणि नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी लोकांमध्ये मिसळून काम करा : प्रा. माणिकराव साळुंखे

अध्यक्षीय भाषणात प्रा. (डॉ.) माणिकराव साळुंखे यांनी तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर वाढत असतानाच पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी लोकांमध्ये मिसळून काम करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, की बदलत्या हवामानाचे परिणाम भविष्यात अधिक तीव्र होऊ शकतात. या बदलांचा फटका कोल्हापूरसारख्या सधन प्रदेशालाही बसण्याची शक्यता असल्याने पर्यावरण संवर्धनासाठी आतापासूनच कृतीशील प्रयत्न करणे आवश्यक आहे.

डॉ. राजेंद्र सिंह यांनी पावसाच्या पाण्याचे संवर्धन करण्यासाठी विद्यापीठाला दिलेले मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्यानुसार विद्यापीठाने जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. पाण्याची साठवणूक आणि त्याच्या वापराचे योग्य नियोजन करून विद्यापीठाने कोट्यवधी लिटर पाण्याच्या व्यवस्थापनाचे उदाहरण निर्माण केले आहे, असे प्रा. साळुंखे यांनी सांगितले.

महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पाहिलेले आधुनिक भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पर्यावरण संरक्षणाला महत्त्व देणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीसोबतच निसर्गाशी सुसंवाद राखणारा विकास साधला पाहिजे. त्यासाठी समाजात पर्यावरणविषयक जाणीव निर्माण करून नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक कुलसचिव डॅा.व्ही.एन.शिंदे यांनी केले. नेहरू अभ्यास केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. प्रल्हाद माने यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. डॉ. नेहा वाडेकर आणि डॉ. दत्तात्रय सावंत यांनी सूत्रसंचालन केले. कॉ. दत्ता देशमुख अध्ययन केंद्र व गांधी अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. प्रकाश पवार यांनी आभार मानले. या व्याख्यानाला विद्यापीठातील विविध विभागांचे प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी, पर्यावरणप्रेमी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes