साखर कारखानदारी आणि शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी 'कोल्हापुरात' एल्गार; 'शेतकरी व साखर कारखानदारी बचाव आंदोलना'ची स्थापना
schedule03 Jul 26 person by visibility 138 categoryउद्योग
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या साखर उद्योगास मारक असलेल्या धोरणांमुळे महाराष्ट्रातील साखर कारखानदारी आणि शेतकरी वर्ग सध्या गंभीर संकटात सापडला आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि सरकारला जाब विचारण्यासाठी 'पदवीधर मित्र' संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माणिक पाटील (चुयेकर) यांनी पुढाकार घेतला असून, कोल्हापुरात 'शेतकरी व साखर कारखानदारी बचाव आंदोलना'ची स्थापना करण्यात आली आहे.
साखर उद्योगासमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना, साखर कारखान्यांचे चेअरमन, संचालक आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचे काम माणिक पाटील यांनी सुरू केले आहे. या उपक्रमाला सर्व स्तरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. माणिक पाटील यांनी नुकत्याच केलेल्या अन्नत्याग आंदोलनामुळे राज्यातील शेतकरी व साखर उद्योगाच्या मागण्यांना एक व्यासपीठ मिळाले असून, त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून एफआरपी (FRP) ४५०० रुपये आणि एमएसपी (MSP) मध्ये २० रुपयांची वाढ करण्यासह साखर उद्योगाच्या इतर प्रलंबित प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. या बचाव आंदोलनाचे पहिले अधिवेशन लवकरच कोल्हापुरात आयोजित केले जाणार असून, त्याद्वारे सरकारवर दबाव निर्माण केला जाणार असल्याचे माणिक पाटील (चुयेकर) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.