दहावी नंतरच्या पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; ६ जुलैपर्यंत नोंदणीची संधी
schedule03 Jul 26 person by visibility 109 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करीता प्रथम वर्ष पोस्ट-एसएससी (दहावी नंतरचे) पदविका अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि वास्तुकला अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. या सुधारित वेळापत्रकानुसार, इच्छुक उमेदवारांना आता ६ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन नोंदणी, कागदपत्रे अपलोड करणे आणि अर्ज निश्चित करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांच्या सुविधेसाठी ई-स्क्रूटनी किंवा प्रत्यक्ष स्क्रूटनी अशा दोन्ही पद्धती उपलब्ध आहेत.
नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ७ जुलै २०२६ रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल आणि त्यावर ८ ते ९ जुलै दरम्यान तक्रार नोंदवता येईल. त्यानंतर १० जुलै २०२६ रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रदर्शित केली जाईल. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (CAP) पहिल्या फेरीसाठी १० जुलै रोजी जागांची माहिती उपलब्ध होईल, त्यानंतर ११ ते १३ जुलै या कालावधीत उमेदवारांना ऑनलाईन पसंतीक्रम (Option Form) भरता येतील. पहिल्या फेरीचे तात्पुरते जागा वाटप १५ जुलै रोजी जाहीर होणार असून त्यानंतर जागा स्वीकारणे आणि प्रवेश निश्चितीची प्रक्रिया १६ ते १८ जुलै दरम्यान पार पडेल.
तंत्रशिक्षण संचालनालयाने एकूण चार प्रवेश फेऱ्यांचे नियोजन केले असून, प्रवेशाची सर्व प्रक्रिया १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रवेशाच्या पुष्टीकरणासाठी विद्यार्थ्यांना जागा-स्वीकृती शुल्क म्हणून १,००० रुपये ऑनलाईन भरावे लागतील आणि त्यानंतर प्रत्यक्ष संस्थेत जाऊन मूळ कागदपत्रांची पडताळणी करणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी किंवा तांत्रिक मदतीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ https://poly26.dtemaharashtra.gov.in/ ला भेट द्यावी किंवा मदतकक्ष क्रमांक +917249724418 वर सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत संपर्क साधावा, असे संचालनालयातर्फे सूचित करण्यात आले आहे.