SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पेपर लीक प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी!डी. वाय. पाटील अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या ७२ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवडसिंधुदुर्गातून ‘गोकुळ’चे एक लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्टदिल्लीतील विद्यार्थी लाठीमाराचा निषेध आणि अन्याय-अत्याचाराविरोधात उद्या महाराष्ट्र बंदजिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 6.85 टीएमसी पाणीसाठाराजर्षी शाहू कार्य संवर्धन संमेलन २६ जुलै रोजी; कोल्हापुरात २५ शाहू अभ्यासकांना निमंत्रणभारताचे राष्ट्रीय वैभव: बंगाल टायगरसोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा; शिवाजी विद्यापीठाबाहेर इंडिया आघाडीचे आक्रमक प्रदर्शन!दिल्लीत राडा: पीएम निवासस्थानाबाहेर निदर्शनादरम्यान राहुल गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात, धक्काबुक्कीत नाकातून वाहू लागले रक्तसासने मैदानावरील अद्ययावत बॅडमिंटन हॉलचे काम ८० टक्के पूर्ण; आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी केली कामाची पाहणी

जाहिरात

 

सिंधुदुर्गातून ‘गोकुळ’चे एक लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट

schedule22 Jul 26 person by visibility 144 categoryउद्योग

◼️गोकुळ व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची संयुक्त प्राथमिक नियोजन बैठक संपन्न

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) यांच्या दूध वाढ कृती कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूध संकलन वाढीसाठी गोकुळ दूध संघ व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संयुक्त विद्यमाने ओरस येथे प्राथमिक नियोजन बैठक मंगळवार, दि. २१ जुलै २०२६ रोजी झाली. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोकुळकडे दररोज सुमारे २० ते २५ हजार लिटर दूध संकलित होत असून, ते टप्प्याटप्प्याने वाढवून प्रतिदिन एक लाख लिटरपर्यंत नेण्यासाठी आवश्यक नियोजनाबाबत बैठकीत चर्चा झाली.

 बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोकुळच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष तथा सिंधुदुर्गचे जिल्हा उपनिबंधक प्रदीप मालगावे होते. यावेळी नवीन दूध संस्थांची स्थापना, विद्यमान संस्थांचे सक्षमीकरण, अधिकाधिक दूध उत्पादकांना गोकुळशी जोडणे, सेवा सहकारी संस्थांमार्फत दूध संकलन वाढविणे, दूध उत्पादकांना आधुनिक दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण देणे, पशुवैद्यकीय सेवा अधिक सक्षम करणे, वैरण विकास तसेच शासन आणि गोकुळच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक दूध उत्पादकांपर्यंत पोहोचविण्याबाबत तसेच दुभती जनावरे खरेदीसाठी जिल्हा बँकेमार्फत सुलभ कर्जपुरवठा उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.

यावेळी बोलताना गोकुळचे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मालगावे म्हणाले, "गोकुळ दूध संघाने नेहमीच दूध उत्पादकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले असून स्पर्धात्मक दूध दर, विविध सेवासुविधा, तांत्रिक मार्गदर्शन आणि दुग्ध व्यवसायाला चालना देणाऱ्या योजनांच्या माध्यमातून दूध उत्पादकांना सक्षम करण्याचे काम सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूध उत्पादन वाढीस मोठी क्षमता असून, अधिकाधिक शेतकरी आणि संस्था गोकुळशी जोडून प्रतिदिन एक लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट नियोजनबद्ध पद्धतीने साध्य करण्यात येईल."

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी म्हणाले, "गोकुळचा दूध वाढ कृती कार्यक्रम जिल्ह्यातील दुग्धव्यवसाय वाढीसाठीचा महत्त्वाचा टप्पा ठरेल. दूध उत्पादकांना जातिवंत गायी-म्हैशी खरेदीसाठी आवश्यक कर्जसुविधा व आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक पूर्ण सहकार्य करेल."

 या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोकुळच्या वतीने जातिवंत म्हशींचे खरेदी-विक्री केंद्र सुरू करावे, पशुवैद्यकीय सेवा अधिक गतिमान व प्रभावी करावी तसेच दुग्ध व्यवसायाबाबत नियमित प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावीत, अशा सूचना दूध उत्पादकांनी मांडल्या. या सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करू असे यावेळी सांगण्यात आले.

 बैठकीत गोकुळ दूध संघ, सिंधुदुर्ग जिल्हा बँक, कृषी व पशुसंवर्धन विभाग तसेच स्थानिक संस्थांच्या समन्वयातून दूध वाढ कृती कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाला नवी चालना मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच गोकुळच्या दूध संकलनातही लक्षणीय वाढ होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, गोकुळचे अधिकारी डॉ. दयावर्धन कामत, धनाजी पाटील, भरत मोळे, सर्जेराव मानकर, डॉ.प्रकाश दळवी, डॉ.नितीन रेडकर, विलास पाटील, शंकर जोंदळेकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अधिकारी तसेच दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes