विमानतळ परिसरातील कचरा व्यवस्थापनासाठी मार्गदर्शनपर बैठक संपन्न
schedule03 Oct 25 person by visibility 56 categoryराज्य

कोल्हापूर : भारतीय वायू अधिनियम २०२४ मधील तरतुदीनुसार विमानतळापासून १० किमी परिसरात कचरा उघड्यावर टाकणे, प्रक्रिया करणे, कत्तलखाने, मत्स्य व्यवसाय इत्यादी बाबींना मनाई आहे. अशा कचऱ्यामुळे कीटक, सरपटणारे प्राणी, उंदीर, कुत्रे अशी परीसंस्था तयार होऊन आणि त्यावर पक्षी आकर्षित होतात. कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी 'माझा कचरा, माझी जबाबदारी' अशी संकल्पना 'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून संपूर्ण देशात दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छोत्सव साजरा करण्यात आला होता. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला होता.
करवीर उपविभागीय अधिकारी श्रीमती मोसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर विमानतळ परिसरातील घन कचरा व्यवस्थापन व तत्संबंधी शासकीय परवाना प्रक्रियेबद्दल उजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यालय अंतर्गत मार्गदर्शनपर बैठक घेण्यात आली. बैठकीस कोल्हापूर विमानतळ संचालक अनिल शिंदे व करवीरचे गटविकास अधिकारी डॉ. संजय भंडारी तसेच सरपंच सर्वश्री उत्तम विलासराव आंबवडेकर, शुभांगी किरण आडसूळ, सौ. संगीता हराळे, श्री. चंद्रकांत डावरे, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक व स्वच्छता दूत उपस्थित होते.
कचऱ्याची व्यवस्था करणे केवळ आरोग्य आणि परिसराच्या सुशोभीकरणापुरती मर्यादित नसून कोल्हापूर शहर व आसपासच्या गावातील पर्यटनास सुकर अशी व्यवस्था करणे हे आपले उद्देश असल्याचे प्रतिपादन श्रीमती चौगुले यांनी केले. कित्येक वर्षे आपल्या घरातील ओला कचरा, निर्माल्य असे विघटन योग्य वस्तूंपासून कंपोस्ट खत बनविण्याचा उपक्रम गेली वीस वर्षे त्या राबवत आहेत, याचा दाखला देत त्यांनी कचऱ्याचे पृथःकरण उगमान स्थानापासून करण्याची संस्कृती अंगीकृत करण्याची हीच वेळ आहे याचा आग्रह केला. भविष्यात लोकवस्ती वाढ होत असल्याने कचरा व्यवस्थापन करण्यास जागा उपलब्ध होऊ शकणार नसल्याचे देखील निदर्शनास आणून दिले.
व्यक्तिगत स्वरुपात प्रत्येकाने जबाबदार नागरीक असल्याची भूमिका घेतली नाही तर, कालांतराने निसर्गाचा कोप पाहायला लागेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. सर्व ग्राम स्वच्छता सेवकांना या जनजागृतीमध्ये सामील करतानाच त्यांनी आज पावेतो करीत असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या सेवेला नमन केले.
कचरा व्यवस्थापनातील त्रुटींमुळे पक्ष्यांच्या वाढीस पूरक परिसंस्था प्रथापित होऊन त्यामुळे विमानांच्या संचालनास बाधा उत्पन्न होत असल्याने, अपघात होण्याची शक्यता बळावते. विमान अपघातात जीवित, भौतिक व आर्थिक हानी होतेच पण त्याबरोबर भारताच्या संरक्षित विमान सेवेतील मानांकनास जागतिक पातळीवर क्षती पोचते या बद्दल लक्ष वेधून त्यास अत्यंत समयसूचक ठोस उपयोजना करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन विमानतळ संचालक शिंदे यांनी केले. या विषयी विमानतळ पर्यावरण समितीची द्वैमासिक बैठक भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या समन्वयाने, जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली जाते. विमानतळ परिसरातील बाधक इमरती, झाडे, विद्युत पुरवठा व मोबाईल प्रक्षेपक खांब, इत्यादीचे Aircraft (Demolition of Obstructions Caused by Buildings and Trees etc.) Rules, १९९४ व कचरा व्यवस्थापन हे GSR ७७१ इ. नियमावलीनुसार हटविण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे.
उजळाईवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच उत्तम आंबवडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व त्यांच्यार्फत जिल्हा नियोजन मंडळामार्फत महत्त्वाकांक्षी घन कचरा प्रक्रिया व व्यवस्थापन प्रकल्पाची माहिती दिली. या विषयी श्री. शिंदे यांनी आवश्यक ती परवानगी नागरी विमानवाहतूक महासंचालक यांच्या कार्यालयाकडून प्राप्त करुन देण्यासाठीची मदत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच इतर ग्रामस्थांनी या विषयाचे प्रस्ताव सादर केले तर एकत्रित हा प्रश्न मार्गी लावता येईल असेही सांगितले. लवकरच बांधकाम व्यावसायिक व संबंधित प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी विमानतळ हद्दीतील बांधकामांना ना हरकत प्रमाणपत्र (Height NOC) संबंधीचे प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.
बैठकी दरम्यान स्वच्छतेबाबत शपथ घेतली गेली. स्वच्छता पंधरवडा अर्थात स्वच्छतोत्सव कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम आरंभ केला असल्याने याची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करून यशस्वी होण्याचा निर्धार करण्यात आला. श्रीमती चौगुले यांच्यातर्फे पुढील खेपेस होतकरु दहा- वीस स्वयंसेवी व्यक्तींसह प्रत्येक गावात प्रशिक्षण योजून स्वच्छता, संस्कृती राबविण्यासाठी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.